एका क्लिकवर ‘हेल्पर’ आपल्या दारी, मेट्रो शहरांत घरगुती कामांसाठी ऑनलाईन बुकिंगची क्रेझ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सकाळी ऑफिसला पोचायची घाई असते. घरातील कामेही झालेली नसतात. अशावेळी वाटतं की कुणीतरी मदतीला आलं तर किती बरं होईल ना… दैनंदिन जीवनातील या अडचणीवर आता एक डिजिटल सोल्युशन मार्पेटमध्ये आलंय. आपण ज्या पद्धतीने अन्नधान्य, खाद्य मोबाईल अॅपवरून  मागवतो, अगदी तसंच काहीसं सुरू आहे. भाजी कापणे, पीठ मळणे, कपडयांना इस्त्री करणे अशी कामे करण्यासाठी एका क्लिकवर तुम्हाला हेल्पर मिळत आहेत. म्हणजे तुमच्या मदतीला माणूस येतोय. फक्त त्यासाठी थोडे शुल्क द्यायाची तयारी ठेवावी लागते.

ऑनलाईन मेड किंवा हेल्पर हे गिग इकोनॉमीचे हे नवीन आणि वेगाने विकसित होणारे रुप आहे.  ग्राहकांना फक्त आपले मोबाईल अॅप उघडायचे आहे. कामाच्या स्वरूपानुसार हेल्पर निवडायचा आणि बुकाRग करायचे. त्यानंतर प्रशिक्षित हेल्पर घरी येऊन काम करेल.

दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, पुणे आदी शहरांत नवीन सेवेचा विस्तार होत आहे. या कामांसाठी  स्नॅबिट, बुकमायबाई, मिडक्लॅप, ब्रुमीज, सुलेखा आणि हेल्परफॉरयू असे अनेक प्लॅटफॉर्म सक्रीय आहेत. या कंपन्या स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीट यांच्याप्रमाणे ऑन डिमांड सर्विस सेक्टरमध्ये काम करत आहेत. मागणी तसा मदतनीसाचा  पुरवठा असे त्यांचे सूत्र आहे.

घरातील पसारा आवरणे असू दे किंवा भांडी घासणे, हेअरकट करणे अशा अनेक सर्विस या ऑनलाईन अॅप्सवर उपलब्ध आहेत.  लोकांचाही या अॅप्सवर विश्वास वाढू लागलाय. एका अहवालानुसार, बंगळुरू येथील ‘स्नॅबिट’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऑगस्ट 2025 मध्ये एक लाख ऑर्डर्स आलेल्या आहेत. हा आकडा फेब्रुवारी 2026पर्यंत प्रतिमहिना 10 लाख ऑर्डरपर्यंत पोचला आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील कामांची व्याप्ती खूप मोठी आहे. घराची साफसफाई, पार्टीनंतरची आवराआवर, रोजचा स्वयंपाक, स्वयंपाकघरातील छोटया छोटया कामांत मदत, मुलांचा सांभाळ, ज्येष्ठांची काळजी आदी अनेक कामांचा समावेश आहे. या कामांसाठी ग्राहकांच्या घरी पाठवण्यात येणारे हेल्पर सगळे प्रशिक्षित असतात. त्यांची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना पाठवले जाते.