लेख – ऊर्जा क्षेत्र आणि आत्मनिर्भरता

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन ([email protected])

एकेकाळी हिंदुस्थान पर्यायी आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांबाबत कमालीचा मागे होता. आता मात्र हिंदुस्थानच्या एकूण ऊर्जेत नवीकरणीय ऊर्जेचा वाटा जवळपास 42 टक्के झाला आहे. हा वाटा अधिकाधिक वाढावा यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. सध्याच्या घडीला हिंदुस्थानचा सर्वाधिक पैसा कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च होतो. अशा परिस्थितीत पर्यायी व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांनी कच्च्या तेलाची जागा घेतल्यास हिंदुस्थानचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. कारण परकीयांकडून भागवल्या जाणाऱ्या गरजा कमी असतील तर कोणत्याही देशाचा दबाव हिंदुस्थानवर पडू शकणार नाही.

हिंदुस्थान 85 टक्के तेल आणि 65 टक्के नैसर्गिक वायू आयात करतो. हिंदुस्थान आपल्या कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या मोठय़ा गरजा मध्य-पूर्व, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतून भागवत आहे, परंतु, जागतिक ऊर्जा पुरवठा व्यवस्थेत व्यत्यय आल्याने त्याचा भार प्रत्येक देशावर पडत आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थानने कच्च्या तेलाचे सामरिक साठे वाढवणे आवश्यक आहे. अमेरिका, मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतील देशांतून अधिकाधिक तेल कसे आणायचे, याचे मार्ग हिंदुस्थान शोधत आहेच. त्याच वेळी हिंदुस्थान रशियाकडून मोठय़ा प्रमाणात तेल घेत आहे.

पेंद्र सरकारने हरित हायड्रोजनशी संबंधित योजनेला मंजुरी दिली आहे. चालू महिन्यातच पेंद्रीय मंत्रिमंडळाने 19 हजार 744 कोटींच्या विशाल निधीसह हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी दिली. या उपक्रमाद्वारे 2030 पर्यंत पाच दशलक्ष मेट्रिक टन स्वच्छ हायड्रोजन इंधनाचे उत्पादन करण्याचा उद्देश आहे. त्यात साईट (स्ट्रटेजिक इंटरव्हेन्शन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन) कार्यक्रमासाठी रु.17,490 कोटी, पथदर्शी प्रकल्पांसाठी रु. 1,466 कोटी, संशोधन आणि विकासासाठी रु. 400 कोटी आणि इतर घटकांसाठी 388 कोटी रुपयांचा खर्च येईल. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित घटकांच्या अंमलबजावणीसाठी ही नवीन योजना मार्गदर्शक असेल.

हरित हायड्रोजन

हरित हायड्रोजन म्हणजे ज्यावेळी वीज पाण्यामधून जाते त्यावेळी हायड्रोजन तयार होतो. या हायड्रोजनचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. जर हायड्रोजन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी वीज अक्षय स्रोताकडून आली असेल, म्हणजेच विजेच्या उत्पादनात प्रदूषण होत  नसेल तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या हायड्रोजनला हरित हायड्रोजन म्हणतात. हरित हायड्रोजनवर भरपूर संशोधन झालेले असून हे नवे इंधन आता हिंदुस्थानात मुख्य प्रवाहात आणले जात आहे. उद्योग जगताकडून या क्षेत्रात आठ लाख कोटींची गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे. यावरूनच हरित हायड्रोजनविषयक उपक्रम आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होते. तसेच आगामी आठ वर्षांत हरित हायड्रोजनच्या उत्पादनाने अतिरिक्त 125 गीगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता आणि सहा लाख रोजगाराची आशा आहे.

लिथियम खाणी अधिग्रहण

ऊर्जेवरील परावलंबित्व दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हरित हायड्रोजनकडे पाहिले जात असतानाच हिंदुस्थानबाहेरील पर्यायी ऊर्जा स्रोतांचाही शोध घेतला जात आहे. हिंदुस्थानने संभाव्य अधिग्रहण वा दीर्घकालीन भाडेपट्टा तत्त्वावर अर्जेंटिनामध्ये दोन लिथियम खाणी आणि एका तांब्याच्या खाणीची निश्चिती केली आहे.

या खाणींचे मूल्यांकन सुरू झाले असून फेब्रुवारी याबाबतचा अहवाल येणार आहे. पेंद्र सरकारने अर्जेंटिनामध्ये संभाव्य लिथियम भंडार अधिग्रहणासाठी गेल्या वर्षी भूशास्त्र्ाज्ञ पथकामध्ये ‘मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘खनिज विदेश इंडिया लिमिटेड’ आणि हिंदुस्थानी भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या शास्त्र्ाज्ञाचा समावेश होता. विजेवर चालणाऱ्या या वाहनांसाठी ‘लिथियम आयन बॅटरी’ची आवश्यकता असते. हिंदुस्थानात विजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असून अशा परिस्थितीत लिथियम खाणींचा करार हिंदुस्थानसाठी महत्त्वाचा आहे.

सौर ऊर्जा

पर्यायी ऊर्जा स्रोतांपैकी हिंदुस्थानने सौर ऊर्जेच्या क्षेत्रात चांगलीच प्रगती केली आहे. हिंदुस्थान सध्या सौर पॅनेल आणि अन्य आवश्यक वस्तूंची आयात चीन आणि व्हिएतनामकडून करत आहे, पण ही आयातही कायमस्वरूपी राहणार नसून आयातीवर अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनेही हिंदुस्थान वेगाने पावले टाकत आहे. त्यासाठी पेंद्र सरकारने विशेष ‘पीएलआय’ योजनाही सुरू केली आहे. या योजनेद्वारे सरकारकडून सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्यांना भरघोस पाठिंबा दिला जात आहे. गेल्या साडेआठ वर्षांच्या कालावधीत सौर ऊर्जा क्षमतेत 19.3 पटीने वाढ झाली आहे. ऊर्जा मंत्रालयानुसार, हिंदुस्थानची सध्याची सौर ऊर्जा क्षमता 62 गीगावॅट इतकी आहे. आपण सौर ऊर्जेच्या बाबतीत जागरूक जरी असलो तरी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याबद्दल खूपच कमी माहिती आपल्याला असते. कशा पद्धतीने आपण ‘सोलर प्लॅंट्स’ ‘इन्स्टॉल’ करावेत, त्यांचा आपल्याला खरेच उपयोग होतो का, हे तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि याची माहिती सर्वसामान्य ग्राहकांना होणे हेही गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांना याबद्दलचे शिक्षण देणे गरजेचे आहे ही सर्वात मोठी गरज आहे.

 ऊर्जा हे उद्योगधंद्यांसाठी इंधनच आहे. तेव्हा या ऊर्जेचा सुयोग्य आणि किफायतशीर दरांत वापर करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे. त्यातच आजचा जमाना हा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा. तेव्हा सर्वसामान्यांच्या तसेच उद्योजकांच्या ऊर्जेच्या नेमक्या गरजा ओळखून त्याचा परिपूर्ण विचार करणाऱ्या ‘एनर्जी बे’ या स्टार्टअप क्लाएंटची महिन्याची ऊर्जेची गरज किती, याचा अभ्यास करतो आणि त्यांना नेमका सल्ला देतो, ज्यामुळे ऊर्जा बचत होते.

एकेकाळी हिंदुस्थान पर्यायी आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांबाबत कमालीचा मागे होता. आता मात्र हिंदुस्थानच्या एकूण ऊर्जेत नवीकरणीय ऊर्जेचा वाटा जवळपास 42 टक्के झाला आहे. हा वाटा अधिकाधिक वाढावा यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेतील सर्वाधिक पैसा कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च होतो. तो थांबल्याने तो पैसा अन्य विकास कार्यांवर खर्च करता येईल. या पार्श्वभूमीवर सरकारकडून हरित हायड्रोजन, लिथियमच्या खाणी, सौर ऊर्जा वगैरे पर्यायी व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या उपलब्धतेसाठी केले जाणारे प्रयत्न हिंदुस्थानला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे घेऊन जातील यात शंका नाही.