लेख – मध्य आशियाई देशांना आमंत्रण; स्वागतार्ह पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

26 जानेवारी 2022 रोजी होणाऱया 73व्या ‘‘प्रजासत्ताक दिना’ला प्रमुख अतिथी म्हणून हिंदुस्थानने मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले आहे. यानिमित्ताने मध्य आशियाई प्रदेशाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते. कोरोनामुळे ही उपस्थिती आभासी असेल. ‘प्रजासत्ताक दिनी’ शेजारी देशांच्या समूहाला यापूर्वी 2018 मध्ये दहा दक्षिण आशियाई ‘आसियान’ देशांना असेच एकत्रित आमंत्रण दिले होते. हा प्रदेश हिंदुस्थानसाठी सामरिक व भूराजकीयदृष्टय़ा महत्त्वाचा आहे.

सेव्हिएत संघाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या पाच देशांना एकत्रितपणे ‘मध्य आशिया म्हटले जाते. यामध्ये कझाकिस्तान, किर्गीझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश होतो. या प्रदेशाचे महत्त्व अनेक कारणांमुळे आहे. पहिले म्हणजे नावाप्रमाणेच हा प्रदेश आशिया खंडाच्या मधोमध आणि अत्यंत मोक्याच्या स्थानी आहे. पाचपैकी तीन मध्य आशियाई देशांची सीमारेषा अफगाणिस्तानशी जोडलेली आहे. काबूलमध्ये झालेला सत्तापालट, अमेरिकेची माघार आणि तालिबानचे पुन्हा डोके वर काढणे या पार्श्वभूमीवर मध्य आशियाई देशांचे महत्त्व कित्येक पटीने वाढते.

भौगोलिकदृष्टय़ा समुद्रकिनारा नसलेला असा हा प्रांत आशियातील देश आणि युरोप यांना जोडतो. या देशांमध्ये नैसर्गिक आणि खनिज संपत्ती तेल, नैसर्गिक वायू, युरेनियम, सोने, चांदी, तांबे, कथिल मोठय़ा प्रमाणात आढळते. म्हणूनच हिंदुस्थानसाठी हे देश वरदान आहेत.

1991 मध्ये ‘सोव्हिएत संघ कोसळून पडला आणि मध्य आशियाई देशांना स्वातंत्र्य मिळाले. लगेच ताजिकिस्तानात यादवी युद्ध (1992-97) पेटले. उझबेकिस्तानलाही फुटीरतावाद आणि दहशतवादाने काही काळ ग्रासले. किर्गीझस्तानात राजकीय अस्थिरता माजली. आजही मध्य आशियाई देश दहशतवाद, इस्लामी उग्रवाद यांसारख्या समस्यांना तोंड देत आहेत. युद्धात होरपळणारा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा अत्यवस्थ ‘फाटा’ प्रांताजवळ असल्यामुळे मध्य आशियातील दहशतवाद्यांना ये-जा करण्यासाठी मोकळे रान मिळते. त्याचबरोबर सौदी अरब आणि पाकिस्तानसारख्या देशांतून येणारे कडवे विचार, इंटरनेटच्या माध्यमातून पसरणारा ‘प्रपोगंडा’ यामुळे मध्य आशियातील दहशतवादाला खतपाणी मिळत आहे.

तीन मध्य आशियाई देशांच्या सीमा चीनला लागून आहेत. चीनचे या प्रदेशातील हित ऊर्जा सुरक्षा आणि संपर्कता या क्षेत्रांत आहे. गेल्या 20 वर्षांत चीन या प्रदेशातील सर्वात मोठा व्यापार आणि गुंतवणूक भागीदार म्हणून उदयास आला आहे. येथून सुमारे तीन पाइपलाइन्सद्वारे मोठय़ा प्रमाणावर तेल व वायू चीनला जाते. आपल्या महत्त्वाकांक्षी  ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय)ची घोषणा चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2013 मध्ये कझाकिस्तानातून केली होती. चीनचा वाढता वावर आणि गुंतवणूक आणि त्याद्वारे वाढलेले चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे देश उत्सुक आहेत आणि त्यासाठी हिंदुस्थानसारख्या देशांकडे आशेने पाहतात.

जुलै 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी पाचही मध्य आशियाई देशांना भेट दिली, असे करणारे ते पहिले हिंदुस्थानी पंतप्रधान ठरले. यापैकी प्रत्येक देशाशी हिंदुस्थानने बहुरंगी सहकार्य प्रस्थापित केले आहे. ज्यात संरक्षण, दहशतवादविरोध, व्यापार, ऊर्जा, गुंतवणूक, माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण व कौशल्य-विकास, आरोग्य, कृषी, मनोरंजन आणि पर्यटन अशा क्षेत्रांचा मुख्यत्वेकरून समावेश होतो. तसेच, अलीकडच्या काळात प्रादेशिक संपर्कता (कनेक्टिव्हिटी) पायाभूत सुविधांचा विकास, ‘विकास-भागीदारी’ आणि ‘कोविड’ जागतिक महामारीशी एकत्रित लढायांमध्ये सामील आहे.

ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने योजलेल्या तापी पाइपलाइनचे बांधकाम सध्या सुरू आहे. ज्यायोगे तुर्कमेन गॅसचा पुरवठा हिंदुस्थानला होऊ शकेल. तसेच युरेनियमच्या आयातीसाठी सरकारने कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानसोबत करार केले आहेत त्यापैकी कझाकिस्तानकडून युरेनियमची आयात सुरू झाली आहे. कझाकिस्तानची एक ‘पीस कीपिंग कंपनी’ हिंदुस्थानी सैन्याच्या तुकडीसोबत लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम सैन्यात तैनात झाली आहे.

अफगाणिस्तानात अडकलेल्या हिंदुस्थानींच्या सुटकेसाठी ताजिकिस्तानाने विशेष मदत केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे ताजिकिस्तानचे हिंदुस्थानसाठीचे सामरिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मध्य आशियाई देशांशी हिंदुस्थानचा व्यापार संभाव्यतेपेक्षा खूपच कमी आहे. त्यात वृद्धीसाठी 2020 मध्ये ‘हिंदुस्थान-मध्य आशिया बिझनेस काऊन्सिलची स्थापना करण्यात आली. तसेच त्यासाठी ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ कॉरिडोर, चाबहार बंदर व अश्गाबात करार यांसारखे संपर्कता प्रकल्प हाती घेतले आहेत.

हिंदुस्थानी चित्रपट, दूरदर्शन मालिका, संगीत, नृत्य, खाद्य संस्कृती, योग तेथे लोकप्रिय आहेत. शेकडो मध्य आशियाई विद्यार्थ्यांना दरवर्षी येथे प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे अनेक हिंदुस्थानी विद्यार्थी मध्य आशियात वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. फार्मा, माहिती-तंत्रज्ञान, टेलिमेडिसिन, कृषी, संग्रहालये आणि पुरातत्व, चित्रपट निर्मिती आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात सहकार्याचा विस्तार होत आहे.

या पाचही देशांशी एकत्रितपणे वाटाघाटी करण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर ‘हिंदुस्थान-मध्य आशिया संवाद’ आयोजित करण्यात आला . 18 ते 20 डिसेंबर 2020 नवी दिल्लीमध्ये या संवादाची तिसरी बैठक झाली, यात हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यासमवेत सर्व मध्य आशियाई देशांचे परराष्ट्रमंत्री सामील झाले.

अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेली परिस्थिती, तालिबान सरकारची अनिश्चितता आणि त्यामुळे डोके वर काढलेली असंख्य सुरक्षा आव्हाने, याला तोंड देण्यासाठी सध्या सर्व प्रादेशिक देश तयार होत आहेत. यामध्ये मध्य आशियाई देशांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. हे महत्त्व ओळखून हिंदुस्थानने सुरुवातीपासूनच त्यांच्याशी वाटाघाटींना सुरुवात केली. 10 नोव्हेंबर रोजी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या ‘प्रादेशिक सुरक्षा संवादा’त सर्व मध्य आशियाई देशांच्या सुरक्षा सल्लागारांनी सक्रिय सहभाग घेतला. ‘प्रजासत्ताक दिनी’ या पाच अतिशय महत्त्वपूर्ण, शांतीप्रिय, विकासनशील अशा मध्य आशियाई देशांना एकत्रितपणे आमंत्रण देणे हे स्वागतार्ह पाऊल सरकारने उचलले आहे. त्यायोगे या देशांमध्ये राष्ट्रप्रमुख पातळीवरही संवादाची सुरुवात होईल. भविष्यात हे सहकार्य वाढेल. यातून हे संबंध अजून दृढ होतील.