शिवसेना आमदाराचे अशोक चव्हाणांना खुले आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

”हिंमत असेल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, चांगल्या पहेलवानांशी झालेली लढत मला देखील आवडेल, मात्र माझ्या मतदारसंघात मुदखेड पॅटर्न चालणार नाही”, अशी सणसणीत चपराक आणि टोला शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी लगावत चव्हाण यांना खुलं आव्हान दिलं आहे.

शिवसेना जि.प.सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या वाढदिवसाच्या वेळी त्यांनी हे आव्हान दिलं आहे. गेली काही दिवस चालू असलेल्या या चर्चेला आज हेमंत पाटील यांनी षटकार लगावून पूर्णविराम दिला. वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करताना त्यांनी केलेल्या या गर्जनेने व घोषणेने सबंध जिल्ह्यातून आलेल्या शिवसैनिकांत व कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले. वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, सहसंपर्क प्रमुख उमेश मुंढे, प्रकाश कौडगे, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, शहरप्रमुख दत्ता कोकाटे, नगरसेवक बालाजी कल्याणकर, जि.प.उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे समाधान जाधव, शिक्षण सभापती काँग्रेसचे मिसाळे, जि.प.सदस्य खानापूरकर, माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार, नागोराव इंगोले, अर्धापूरचे तालुकाप्रमुख बालाजी कल्याणकर, माजी पंचायत समिती सदस्य बालाजी कल्याणकर, माजी तालुकाप्रमुख संतोष कपाटे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आमदार हेमंत पाटील यावेळी म्हणाले की, भोकर विधानसभा मतदारसंघात बबनराव बारसे यांनी मागच्या वेळी निवडणूक लढविली. ते नेटाने लढले, प्रामाणिक शिवसैनिकांची फौज त्यांच्यासोबत होती. मात्र सत्ता, संपत्तीच्या जोरावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अमिता चव्हाण यांना निवडून आणले. दडपशाही, सत्ता,संपत्ती, प्रलोभने आणि मतदारांना विकत घेवून या मतदारसंघात मुदखेड पॅटर्न चालविला. चार चार कारखान्यांची मक्तेदारी आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाणांनी ही जागा प्रतिष्ठेची केली. मात्र यापुढे आता हिंमत हरायची नाही, हा मतदारसंघ आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे, अशी स्पष्ट भूमिका पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा स्वतः प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोकराव चव्हाण यांनी एका समारंभात व्यक्त केली होती. ”या मतदारसंघाचे नेतृत्व माझ्याकडे आहे. हिंमत असेल तर अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघात माझ्याविरुध्द निवडणुकीच्या रिंगणात उतरावेच, त्यांनी निवडणूक लढवावी, हे माझे खुले आव्हान आहे. या मतदारसंघात मुदखेड पॅटर्न चालणार नाही, सत्ता, संपत्तीच्या जोरावर या मतदारसंघात मतदार बिथरणार नाहीत आणि भुलणारही नाहीत. मलाही चांगल्या पहेलवानाशी निवडणूक लढवायची आहे, आता होऊनच जाऊ द्या, असे खुले आव्हान देऊन आमदार हेमंत पाटील यांनी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

सोबत उपस्थित असलेल्या शिवसैनिकांत व कार्यकर्त्यांत या आव्हानामुळेचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला बबनराव बारसे यांचे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणि पांडूरंगांची प्रतिमा देऊन आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री सत्यगणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन त्याठिकाणी उपस्थितांनी आरतीही केली. यावेळी धोंडू पाटील, प्रकाश कौडगे, नागोराव इंगोले, भुजंग पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही बबनराव बारसे यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.