
सामना ऑनलाईन । लंडन
जगभरात वाढणाऱ्या कॅन्सरला ( कर्करोग ) आळा घालण्यासाठी आता जगभरातील संशोधकांनी कंबर कसली आहे.ब्रिटनच्या डॉक्टर लिसा हेरॉन या महिला संशोधकाने गेली काही वर्षे संशोधन करीत कोंबडीच्या अंड्यातून कॅन्सरविरोधी प्रोटीन तयार करण्यात यश मिळवले आहे. सध्या अशी अंडी प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात येत आहेत.ती बाजारात विक्रीला आली कि जगभरातील कॅन्सर रुग्णांसाठी ती नवसंजीवनीच ठरणार आहेत. या शोधासाठी संशोधकांनी विशिष्ट जातीच्या कोंबड्यांच्या शरीरात प्रोटीन तयार करणारे जीन्स टोचले.या उपायाने त्या कोंबड्यांची अंडी कॅन्सरविरोधी प्रोटीनचे उत्पादन करू शकणारा मोठा स्रोत बनला.

प्राणी अथवा पक्षांत अशा प्रकारे गुणसूत्रात्मक ( जिनेटिक्स ) बदल घडवून रोगाला संपवणारे प्रोटीन तयार होऊ शकते असा दावा इंग्लंडमधील एडिंबरोच्या रोसीन टेक्नोलोंजि या कंपनीच्या संशोधकांनी केला आहे.हि अंडी कॅन्सरविरोधी स्वस्त औषध ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नवे औषध 10 पट स्वस्त असेल
कोंबडीच्या अंड्यांद्वारे तयार केलेले कॅन्सरविरोधी औषध हे सुरक्षित आणि प्रयोगशाळेत बनणाऱ्या कर्करोगावरील औषंधापेक्षा दहा पटीने स्वस्त असेल.ते बनविण्यासाठी मोठ्या कुक्कुटपालन केंद्रासाठीची( पोल्ट्री ) जागा आणि सशक्त कोंबड्याची गरज लागते.अशा कोंबड्यांतील जिनेटिक बदल मानवी गुणसूत्र टोचून करण्याची प्रकियाही स्वस्त पडते.त्यामुळे या अंड्यांच्या मदतीने बनवले जाणारे कॅन्सररोधी औषधही खूप स्वस्त असेल ,असा दावा डॉक्टर लिसा हेरॉन यांनी केला आहे.
काय आहे शरीरातील प्रोटीन उत्पादनाचे महत्व
मानवी शरीरात कॅन्सरसारखा आजार बळावल्यावर त्याचे शरीर रोगाला प्रतिबंध करणाऱ्या प्रोटिन्सची निर्मिती करू शकत नाही .त्यासाठी त्या रुग्णाला असे प्रोटीन बाहेरून द्यावे लागते.मानवी शरीरात “इफ्नाल्फा 2 अ” आणि “मॅक्रोफेज-सीएसएफ ” हि दोन प्रोटिन्स शरीरातील कर्करोगाच्या पेशींना नष्ट करणे आणि शरीरातील नादुरुस्त पेशींची दुरुस्ती करून माणसाला ठीक करणे अशी कामे करतात.ब्रिटनच्या संशोधकांनी याच प्रोटिन्सचा डोस कोंबड्याना देत कॅन्सर नाशक अंड्यांचे उत्पादन करण्यात यश मिळवले आहे. अर्थात अशा कर्करोगविरोधी अंड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ते औषधरूपात रुग्णांना पुरविण्यासाठी अद्याप 10 ते 20 वर्षांचा कालावधी लागेल असे संशोधकांचे म्हणणे आहे























































