
धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या घाईत एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता, पण रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान आणि एका विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना आज सकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर घडली.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ही रेल्वेगाडी रत्नागिरी स्थानकावर दाखल होत असताना, गाडी पूर्णपणे थांबण्यापूर्वीच एका तरुणाने घाईघाईत उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याचा तोल गेला आणि तो थेट फलाटावर पडला. काही क्षणांतच तो धावत्या रेल्वेखाली येण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र याचवेळी प्लॅटफॉर्मवर हजर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) दोन जवानांनी तत्काळ पुढे येत या तरुणाला वाचवण्यासाठी धाव घेतली.
आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल यांनी कोणताही विचार न करता त्या तरुणाला ट्रॅकवरून खेचून बाहेर काढले. याचवेळी, स्थानकावर उपस्थित असलेला विक्रेता वीर सिंग यानेही तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली. या तिघांनी एकत्रित प्रयत्न करून तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिघांचे कुटून होत आहे.
या साहसी कृत्याबद्दल कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आरपीएफ जवान रणजीत सिंह, महेंद्र पाल आणि विक्रेता वीर सिंग यांचे विशेष कौतुक केले आहे. त्यांनी या तिघांना प्रत्येकी ५,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.