उच्च न्यायालयाचा दणका : 700 विद्यार्थ्यांना दिलासा, कोपरगाव शाळेच्या विकासाचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच वर्षापासून दोन संस्थांच्या न्यायालयीन वादामध्ये चांदे कसारे येथील न्यू इंग्लिश स्कूल सातशे विद्यार्थ्यांना पत्र्याचे शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत होते. परंतु आता धर्मदायक आयुक्त नगर व उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे या वादावर पडदा पडला असून 700 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; इमारतीचा व शाळा विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सन 2017-18 ला समृद्धी महामार्गात या शाळेची जमीन व इमारत बाधित झाल्याने 2 कोटी 72 लाख रुपये एवढी भरभक्कम नुकसान भरपाई मिळाली होती. ज्या कोट्यावधी रुपयांवरून भारत सर्व सेवा संघ पाचेगाव ट्रस्ट न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारे व न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे ट्रस्ट यांच्यात वाद निर्माण झाल्याने सदर प्रकरण धर्मदाय आयुक्त नगर यांच्याकडे गेले. याप्रकरणी धर्मदाय आयुक्त नगर व पुणे या दोन्ही ठिकाणी दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी धर्मदाय आयुक्त यांनी भारत सर्व सेवा संघ पाचेगाव ट्रस्ट न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारे यांच्या बाजूने निकाल दिला होता. परंतु हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचे म्हणत न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे ट्रस्टचे संजय होन यांनी औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल केला होता. याप्रकरणी दोन्ही पक्षाकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सूर्यवंशी यांनी हा निकाल भारत सर्व सेवा संघ पाचेगाव न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारे यांच्या बाजूने दिला आहे. तिसरी पार्टी म्हणून शिवाजी नामदेव आढेराव यांनी देखील या जागेवर आपला हक्क सांगत औरंगाबाद कोर्टात अपील केले होते. मात्र त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. दरम्यान विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

भारत सर्व सेवा संघ पाचेगाव ट्रस्ट न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारे चे बाजूने संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, सचिव प्रकाश जाधव, स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुनील होन व उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी न्यायालयीन लढाई सुरू ठेवली होती.लोकन्यायालयाच्या माध्यमातून देखील ही इमारत पूर्ण व्हावी या दृष्टीने कोर्ट कमिशन नेमून इमारत बांधण्यासाठी शंकरराव चव्हाण व सुनील होन यांनी प्रयत्न केले होते. या निकालामुळे चांदेकसारे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे आता 700 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; असून इमारतीचा व शाळा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र नलगे व सचिव प्रकाश जाधव यांनी देखील हे 2 कोटी 72 लाख रुपये हे चांदेकसारे विद्यालयाचे असून यातील एक रुपया देखील इतरत्र खर्च होणार नसून इमारत व इतर विकास काम करण्याचा सर्व अधिकार न्यू इंग्लिश स्कूल कमेटी चांदेकसारे यांना राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर चांदेकसारे स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुनील होन व उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण म्हणाले, 2 कोटी 72 लाख रुपयांतून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन भव्य इमारत, डिजिटल शाळा व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे त्यांनी सांगितले. औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये भारत सर्व सेवा संघ पाचेगाव न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारे यांच्या वतीने ॲड व्ही. डी. सपकाळ व पी. एस. पवार यांनी काम पाहिले.

सामना प्रभाव

या प्रश्नावर 29 एप्रिल रोजी ‘दैनिक सामना’ या वृत्तपत्रात ‘दोन्ही संस्थांच्या भांडणात विद्यार्थ्यांची ससेहोलपट’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे या दोन्ही संस्थावर पालक वर्गाकडून मोठा दबाव आणण्यात आला होता. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालामुळे विद्यार्थी पालक, भारत सर्व सेवा संघ पाचेगाव, न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चांदेकसारे दैनिक सामनाचे आभार व्यक्त केले.