
गोरेगाव खाडीवरील 36.6 मी. रुंदीच्या उड्डाणपुलाला उच्च न्यायालयाने हिरवा पंदील दाखवला आहे. त्यामुळे शहीद भगतसिंग नगर ते मिल्लत नगरचा प्रवास सुसाट होणार असून येथील वाहतूककाेंडीचा प्रश्नही सुटणार आहे.
येथील वाहतूककाेंडी फोडण्यासाठी महापालिकेने खास या उड्डाणपुलाचे नियोजन केले आहे. त्यासाठी सागरी किनाऱयासह पर्यावरण विभागाच्या परवानग्या पालिकेने घेतल्या आहेत. तिवरांच्या परिसरात बांधकाम करायचे असल्यास न्यायालयाची संमती घेणे बंधनकारक आहे. तसे आदेशच न्यायालयाने 2018 मध्ये दिले आहेत. त्यानुसार या उड्डाणपुलाच्या बांधकामाला परवानगी घेण्यासाठी पालिकेने याचिका केली होती.
मुख्य न्यायाधीश अलोक अराधे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेला बॉम्बे एन्व्हॉरमेंटल अॅक्शन गुपने विरोध केला. तो अमान्य करत न्यायालयाने पालिकेची याचिका मंजूर केली. हा उड्डाणपूल व येथील रस्त्याचे काम वाहतूककाेंडी सोडवण्यासाठी केले जाणार आहे. यासाठी संबंधित सर्व विभागांनी मंजुरी दिली आहे. हा उड्डाणपूल व्यापक जनहित हितासाठी बांधला जात असल्याने यास परवानगी दिली जात आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
444 तिवरांची झाडे लावणार
या उड्डाणपुलामुळे खाडीजवळील तिवरांची 31 झाडे तोडली जाणार आहेत. या बदल्यात 444 तिवरांची नवीन झाडे लावली जातील, अशी हमी पालिकेने न्यायालयात दिली.