प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्याचा गुन्हा गंभीर, हायकोर्टाने फेटाळला जामीन

प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्याचा गुन्हा गंभीर असल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला. कृष्णा पांढरे असे या आरोपीचे नाव आहे. न्या. माधव जामदार यांच्या एकल पीठासमोर पांढरेच्या जामिनावर सुनावणी झाली. खटल्यात प्रगती न झाल्यास जामीन मागण्याची मुभा आहे, असे आठ महिन्यांपूर्वी न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आता ही याचिका करण्यात आली आहे. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी पांढरेने केली.

पांढरेविरुद्धच्या खटल्यात 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवून पूर्ण झाली आहे. तीन ते चार साक्षीदारांची साक्ष नोंदवणे शिल्लक आहे. परिणामी पांढरेला जामीन देऊ नये, अशी विनंती सोलापूर पोलिसांनी केली. खटल्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 2023 मध्ये पांढरेला अटक झाली आहे. त्याला जामीन मंजूर करावा, असे कोणतेच कारण नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने पांढरेची याचिका फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण…

एप्रिल 2023 मध्ये ही घटना घडली. पांढरेचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेला सोबत घेऊन पांढरेने तिच्या पतीचा खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावली. मे 2023 रोजी पांढरेला अटक झाली. त्याच्याविरोधात हत्येचा खटला सुरू आहे.