मुलाची हत्या करणाऱ्या वडिलांना हायकोर्टाकडून जामीन

मुलाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने 30 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

सलीम मदरासी असे या आरोपीचे नाव आहे. तो डोंगरी येथे राहणारा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याच्या अपिलावर निर्णय होईपर्यंत जन्मठेप रद्द करून जामीन मंजूर करावा, अशी मागणी सलीमने केली होती.

न्या. सुमन शाम व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. 24 ऑगस्ट 2018 पासून सलीम कारागृहात आहे. त्याला जामीन मंजूर केला जात आहे. मात्र त्याने आपले वर्तन नीट ठेवावे, असे न्यायालयाने बजावले.

ही घटना ऑगस्ट 2018 मध्ये घडली. सलीमने मुलाचा खून केल्याची तक्रार त्याच्या पत्नीनेच पोलिसांत केली. मुलगा अंमली पदार्थाचे सेवन करायचा. त्यावरून आमच्यात वाद झाला. त्यात मुलाचा बळी गेला. मी जाणीवपूर्वक त्याचा खून केला नाही, असा दावा सलीमने केला. मात्र मुलगा दुसऱ्या पत्नीला आई म्हणायचा नाही. यामुळे सलीम व मुलामध्ये भांडण व्हायचे, अशीही साक्ष काहींनी दिली. सबळ पुरावे सादर झाल्याने सत्र न्यायालयाने सलीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.