लोकल प्रवासावर शासनाने घातलेले निर्बंध सर्वसामान्यांच्या हितासाठीच! हायकोर्टाने याचिकाकर्त्याना फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसींची दोन्ही मात्रा घेतलेल्या लोकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, असे असताना इतर प्रवाशांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी करणाऱया याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले. आईसलँड आणि इस्राएलची परिस्थिती वेगळी असून तेथील लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे त्याची तुलना मुंबईशी करू नका, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने घातलेले निर्बंध सर्वसामान्यांच्या हितासाठीच आहेत. अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना सुनावले.

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू आटोक्यात आल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल करत 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र लस घेणे हे ऐच्छिक असल्याने सरकारचा हा निर्णय राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठबोरवाला यांनी ऍड. नीलेश ओझा व योहन टेंग्रा व ऍड. अभिषेक मिश्रा यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला परदेशातील काही देशांचे व तेथील परिस्थितीची माहिती दिली. त्याचबरोबर लसीकरणाचा काहीही उपयोग नाही, असा युक्तिवाद न्यायालयात केला. हा युक्तिवाद ऐकल्यावर खंडपीठाने याचिकाकर्त्याना फैलावर घेतले. लसीकरण न झालेल्यांना लोकलने प्रवास करू देण्याची तुमची मागणी योग्य कशी काय असू शकते? लसीकरणाचा काहीही फायदा होत नाही, असा दावा तुम्ही कशाच्या आधारावर करताय ते आम्हाला पटवून द्या, अशा शब्दांत खंडपीठाने याचिकाकर्त्यांना झापले. व याचिकाकर्त्यांची मागणी तूर्तास फेटाळून लावत याचिकेवरील सुनावणी चार आठवडय़ांपर्यंत तहकूब केली.

प्रत्येकाने काळजी घ्या

सणासुदीच्या काळात सरकारने निर्बंध जरी शिथिल केले असले तरी प्रत्येकाने सजग राहायला हवे, काळजी घ्यायला हवी, अन्यथा कमी झालेली रुग्णसंख्या व कोरोना पुन्हा वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे, असे मतही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी व्यक्त केले.