मुंबई विद्यापीठासमोरील धोकादायक एस्प्लेनेड इमारत तत्काळ रिकामी करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

फोर्ट इथल्या मुंबई विद्यापीठासमोर धोकादायक स्थितीत उभी असलेली एस्प्लेनेड इमारत तात्काळ रिकामी करा, आवश्यक भासल्यास पोलीस बळाचा वापर करा असे पालिकेला बजावत या इमारतीच्या डागडुजीचे काम हाती घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाला दिले. फोर्ट येथील ‘एस्प्लनेड मेन्शन’ ही इमारत महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे. असे असतानाही इमारतीच्या तळमजल्यावर हॉटेल आणि काही दुकाने सुरू आहेत.

इमारत कोसळून एखादी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. यासंदर्भात अली मोहम्मद यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायमूर्तींनी या इमारतीची अवस्था पाहता ही इमारत तातडीने रिकामी करण्याचे आदेश पालिकेला दिले तसेच म्हाडाला इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यास सांगितले.