
विक्रोळी परिसरातील मुस्लिम समाजाचा कब्रस्तानचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. विक्रोळी व्हिलेज परिसरात सध्या वापरात असलेल्या कब्रस्तानचा विस्तार करण्याची तयारी पालिकेने केली आहे. यासंबंधित प्रस्ताव सुधार समितीकडे पाठवल्याचे पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला कळवले. त्यावर प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश न्यायालयाने पालिकेला दिले.
विक्रोळी, कांजूरमार्ग परिसरातील मुस्लिम समाज विक्रोळी व्हिलेज येथील कब्रस्तानचा वापर करीत आहे. येथील जागेच्या कमतरतेकडे लक्ष वेधत सय्यद झुल्फिकर अहमद यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. चेतन माळी यांनी नागरिकांची गैरसोय न्यायालयाच्या निदर्शनास आणली. तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका व सरकारला निर्देश देण्याची विनंती केली. त्यावर पालिकेतर्फे ऍड. अश्विन साकोळकर यांनी विक्रोळी व्हिलेज येथील कब्रस्तानचा विस्तार करण्यासंदर्भातील प्रस्तावाकडे लक्ष वेधले.
कब्रस्तान विस्तारीकरणासाठी आरक्षणामध्ये आवश्यक तो बदल केला जात आहे. संबंधित प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी 10 नोव्हेंबरला मंजुरी दिली आहे. सध्या सुधार समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा असून ती मिळाल्यानंतर नागरिकांच्या हरकती मागवून प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी नगरविकास खात्याकडे पाठवला जाईल, असे ऍड. साकोळकर यांनी सांगितले. त्याची दखल घेतानाच प्रस्ताव मंजुरीच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. याप्रकरणी 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
मृतदेह वाट पाहू शकत नाहीत!
विक्रोळी व्हिलेजच्या कब्रस्तान विस्तारीकरणासंबंधी प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पालिकेने चार आठवडय़ांचा वेळ मागितला. त्यावर खंडपीठाने पालिका आणि राज्य सरकारला अधिक वेळ न दवडता शक्य तितक्या लवकर प्रस्ताव मार्गी लावण्याचे निर्देश दिले. मृतदेह वाट पाहू शकत नाहीत, अशी टिप्पणी मुख्य न्यायमूर्तींनी यावेळी केली.
























































