माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान

कोल्हापूर येथील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातला पाठवावे की नाही यावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. स्वतिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था मठाची ही हत्तीण आहे. तिला गुजरातला पाठवण्याच्या उच्चाधिकार समितीच्या निर्णयाला मठाने याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. मठ व उच्चाधिकार समितीच्या युक्तिवादानंतर या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला. 1992 पासून ही हत्तीण मठाकडे आहे. कोल्हापूर व कर्नाटकमधील गावकऱ्यांचे या हत्तीणीशी भावनिक नाते जोडले गेले आहे. त्यामुळे माधुरीला गुजरातला पाठवण्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. वरीष्ठ वकील सुरेश शाह व अॅड. मनोज पाटील यांच्यामार्फत मठाने ही याचिका केली आहे.

काय आहे प्रकरण?

माधुरी हत्तीणीची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप पेटाने केला होता. याची शहानिशा करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली. समितीने 2023 मध्ये या हत्तीणीला गुजरातला पाठवण्याची शिफारस केली. त्याविरोधात मठाने याआधी याचिका केली होती.