वाळू घोटाळा, अप्पर जिल्हाधिकार्‍यांना न्यायालयाने झापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

सामना ऑनलाईन । मुंबई

वाळू उत्खनन लिलाव प्रक्रियेत ठेकेदाराशी संगनमत करून सुमारे आठ कोटी रुपयांचा वाळू घोटाळा महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला फैलावर घेत महसूल विभागाला चांगलेच खडसावले. या घोटाळ्यात सामील झालेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांसह इतर अधिकार्‍यांवर आतापर्यंत काय कारवाई केली त्याची आधी माहिती द्या, असे फटकारत हायकोर्टाने सातारा जिल्हाधिकार्‍यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

वाळू उपसा करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकार्‍यांकडून निविदा काढण्यात आल्या. कृष्णा नदीकाठच्या बेलवडे-शिरवडे हवेली येथील  10 हजार 70 ब्रास वाळू गणेश नलावडे यांना 15 कोटी 60 लाखांना मंजूर झाली. नियमानुसार त्यांनी 25 टक्के रक्कम म्हणजेच 3 कोटी 9 लाख रुपये महसूल प्रशासनाकडे भरले. उर्वरित रक्कम 15 दिवसांत भरणे बंधनकारक असतानाही नलावडे ही रक्कम भरण्यास अपयशी ठरले. तसेच त्यांनी निविदा भरण्यासंदर्भात मुदतवाढ घेतली. याचदरम्यान पाच ठेकेदारांना पैसे भरता आले नाही म्हणून त्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. अधिकारी आणि नलावडे यांच्यात साटेलोटे असल्यानेच त्यांना वारंवार मुदतवाढ देत असल्याचा आरोप इतर ठेकेदारांनी केला आहे. दरम्यान, नलावडे यांनी वाळूचा सुमारे 400 ब्रास उपसा केला असून सेलटॅक्स आणि व्हॅटच्या स्वरूपात 75 लाखांचा धनादेश अद्याप वटलेला नाही. ही बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. लोकांच्या विरोधामुळे वाळू उपसा केला नसल्याने आपले नुकसान होत आहे. त्यामुळे आपले पैसे परत द्यावे अशी मागणी नलावडे यांनी केल्यानंतर महसूल विभागाकडून नलावडे यांना 7 कोटी 50 लाख देण्यात आले. त्यामुळे अधिकार्‍यांच्या आशीर्वादानेच अफरातफर झाल्याचे याचिकाकर्त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.  

बुडालेला महसूल 18 टक्के व्याजासह वसूल करा

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीवेळी अॅड. दिलीप बोडके यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. घोटाळा करणार्‍या संबंधित महसूल विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करा तसेच शासनाचा बुडालेला महसूल 18 टक्के व्याजासह वसूल करण्यात यावा अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत याबाबतची सुनावणी 3 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.