
मेळघाट तसेच महाराष्ट्रातील दुर्गम भागात बळी जाणाऱ्या बालमृत्यूवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारसह केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू हे अत्यंत भयंकर असून सरकारचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निष्काळजीपणाचा असू शकत नाही, असे फटकारत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने सरकारला जाब विचारला. इतकेच नव्हे तर, मेळघाटात महिनाभरात 4 बालके आणि 2 स्तनदा माता दगावल्याने त्याबाबत चिंता व्यक्त करत, सरकारला स्त्राrरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञांसह विशेष डॉक्टरांची प्राधान्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले.
मेळटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते बंडू साने, डॉ. राजेंद्र बर्मा यांच्यासह डॉ अभय बंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर आज गुरुवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील जुगल गिल्डा यांनी खंडपीठाला सांगितले की, उच्च न्यायालयात झालेल्या शेवटच्या सुनावणीनंतर एका महिन्यात सुमारे 4 बालके आणि 2 महिलांचा मृत्यू झाला आहे आणि न्यायालयाने अनेक निर्देश देऊनही सरकारने कोणतीही सुधारणा केलेली नाही. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉक्टर आदिवासी भागात काम करण्यास तयार नाहीत आणि कोटय़वधी रुपये खर्च करूनही या ठिकाणी कोणतेही रुग्णालय बांधले गेले नाही. यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.
उपचारासाठी रुग्णांना अमरावतीपर्यंत जावे लागते. हे योग्य नाही, असे फटकारत न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले. तसेच पुढील सुनावणीच्या वेळी आम्ही महिला आणि बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना किंवा सहसचिवांना उपस्थित राहण्यास सांगू, असा इशारा देत खंडपीठाने सुनावणी 16 जानेवारीपर्यंत तहकूब केली.
न्यायालय काय म्हणाले…
जेव्हा जेव्हा आम्ही हे प्रकरण हाती घेतो, तेव्हा आम्हाला स्त्राrरोगतज्ञांच्या अनुपलब्धतेमुळे आणि औषधांच्या अभावामुळे मुले आणि मातांच्या मृत्यूची माहिती दिली जाते. डॉक्टरांची नियुक्ती कदाचित कंत्राटी पद्धतीने किंवा प्रतिनियुक्तीवर केली पाहिजे. मेळघाट आणि अमरावतीमध्ये बरेच अंतर आहे. या भागात जाणाऱया डॉक्टरांना काही अतिरिक्त प्रोत्साहन मिळाले पाहिजे. अनुभवी लोकांची नियुक्ती केली पाहिजे आणि तिथे गैर-विशेषज्ञ डॉक्टर चालणार नाहीत, असे न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी सांगितले.



























































