रहिवाशांचे मत विचारात घेणे गरजेचं वाटत नाही का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई

रहिवाशांना न जुमानता काम रेटणाऱ्या मेट्रो प्रशासनाचा हायकोर्टाने आज चांगलाच समाचार घेतला. मेट्रोची मार्गिका ठरवताना तेथील रहिवाशांचे मत विचारात घ्यावेसे प्रशासनाला वाटत नाही का, ‘मेट्रो 2 बी’चा अंतिम आराखडा ठरवल्यानंतर स्थानिकांचा अभिप्राय प्रशासनाने का घेतला नाही, लोकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी मेट्रोने नोटीस काढली असेल तर ती नोटीस कोर्टाला प्रशासन का दाखवत नाही अशा प्रश्नांची सरबत्तीच हायकोर्टाने केली. एवढेच नव्हे तर मनमर्जी काम करणाऱ्या मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर असमाधान व्यक्त करत यासंदर्भात जाबही विचारला.

‘मेट्रो 2 बी’च्या बांधकामाविरोधात जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट हाऊसिंग सोसायटी, गुलमोहोर एरिया सोसायटी वेल्फेअर ग्रुप आणि नाणावटी रुग्णालयाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मेट्रोचे काम भूमिगत करण्यात यावे अशी रहिवाशांची मागणी असून खोदकामाची परवानगी न घेताच रस्ते खोदल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेतून केला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी मेट्रोच्या बांधकामावरून हायकोर्टाने ‘एमएमआरडीए’ला खडसावले. मेट्रोचा मार्ग ठरवण्यापूर्वी लोकांचे मत विचारात घेतले होते का, आराखडय़ावर लोकांना काही सूचना अथवा शंका उपस्थित करायची असेल तर त्यासंदर्भात नोटीस प्रशासनाने काढली होती का असे प्रश्न खंडपीठाने मेट्रोला विचारले, परंतु त्याची समाधानकारक उत्तरे देता न आल्याने हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत याबाबतची सुनावणी 24 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

निर्णय घेण्याचा अधिकार आमचाच!

नोटीससंदर्भात हायकोर्टाने फटकारल्यानंतर मेट्रो प्रशासनाने आपली भूमिका मांडताना सांगितले की, मेट्रोची मार्गिका ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार आम्हाला आहे. लोकांना याप्रकरणी उत्तरे देणे अथवा त्यांच्याशी याबाबत चर्चा करणे गरजेचे नाही.