हेरिटेज वास्तूंचे गांभीर्य मेट्रोला कळत नाही का, हायकोर्टाचा मेट्रो प्रशासनाला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईकरांना विश्वासात न घेताच काम रेटणाऱया मेट्रोचा फटका दक्षिण मुंबईतील पारसी अग्यारींना बसत आहे. मेट्रोच्या खोदकामामुळे प्रिन्सेस स्ट्रीट आणि काळबादेवी येथील अग्यारींना तडे गेले असून मेट्रोचे काम थांबविण्यासाठी पारसींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. यावरून हायकोर्टाने आज मेट्रो प्रशासनाला खडे बोल सुनावले. दक्षिण मुंबईतील अग्यारी हेरिटेज असल्याने मेट्रो प्रशासनाला त्याचे गांभीर्य कळत नाही का, वास्तूंना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये यासाठी प्रशासन तज्ञांचा सल्ला का घेत नाही, असा खरमरीत सवाल करीत हायकोर्टाने मेट्रो कॉर्पोरेशनवर ताशेरे ओढले.

कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथे मेट्रोच्या भुयारासाठी ड्रिलिंग व खोदकाम करण्यात येत आहे. या कामामुळे प्रिन्सेस स्ट्रीट आणि काळबादेवी येथील पारसींचे धार्मिक स्थळ असलेल्या अग्यारींच्या दिवाळाला तडे गेले आहेत. या कामामुळे भूगर्भातील पाण्याचा प्रवाह बदलून येथील पवित्र विहिरीही कोरडय़ा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोचे काम थांबविण्यात यावे याकरिता काही पारसींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी मेट्रो प्रशासनाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी कोर्टाला सांगितले की, अग्यारीच्या वरंडाखालून भुयाराचे काम होणार आहे. अग्यारीच्या मूळ वास्तूला तसेच तेथील विहिरीला यामुळे कोणताही धोका पोहोचणार नाही. मेट्रो प्रशासनाचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर या वास्तू हेरिटेज असल्याने मेट्रो प्रशासनाला याचे गांभीर्य कळत नाही का, त्यासाठी तज्ञांची समिती नेमावीशी वाटत नाही का? अशा शब्दांत हायकोर्टाने खडसावले.