डोंबिवलीत अतिधोकादायक चंद्रकला इमारत कोसळली; इमारत रिकामी केल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली

रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळून 17 जणांचा बळी गेल्याची दुर्घटना घडून दोन दिवस उलटले नाही तोच डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात शीतला माता मंदिराजवळील चंद्रकला म्हात्रे इमारत गुरुवारी सकाळी अचानक कोसळली. धोकादायक असलेली ही इमारत आधीच रिकामी केलेली असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाथार्ली गाव हद्दीमध्ये असलेली चंद्रकला म्हात्रे ही इमारत काही दिवसांपूर्वीच अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानदारांना ही इमारत रिकामी करण्याची नोटीस पालिका प्रशासनाने बजावली होती. त्यानुसार त्यांनी इमारत रिकामी केली होती. गुरुवारी सकाळी इमारत कोसळताना परिसरात मोठा आवाज झाला व काही काळ घबराट पसरली, मात्र इमारत संपूर्ण रिकामी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन विभागाचे प्रमुख नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन पथक, फेरीवाला विभाग आणि अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.