गिरगावात हायप्रोफाइल ड्रग्जचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हायप्रोफाइल लोकांमध्ये प्रचंड मागणी असणारे आणि 8 ते 10 हजार प्रति ग्रॅम इतके महागडे असणाऱया एमडीएमए या ड्रग्जचा साठा अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने सोमवारी रात्री व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडला. एक तरुण हा साठा विकण्यासाठी घेऊन आला होता, त्यालाही पोलिसांनी अटक केली.

आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कदम आणि त्यांचे पथक सोमवारी रात्री दक्षिण मुंबईत गस्त घालत होते. पठ्ठे बापूराव मार्गावरील सहाव्या लेनमधून पोलीस जात असताना तेथील नागोरी दूध सेंटरजवळ एक इसम संशयास्पद हालचाल करताना पोलिसांच्या नजरेस पडला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्या इसमाकडे एक बॅग होती आणि ती बॅग तो खूप सांभाळत होता, तो कोणाला तरी शोधत होता. त्यामुळे कदम यांचा संशय बळावला आणि त्यांनी सलीम नवाब अब्दुल खान ऊर्फ सलीम तलवार (56) याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात 98 हजार किमतीचे 14 ग्रॅम वजनाचे एमडीएमए हे हायप्रोफाईल ड्रग्ज सापडले.

एमडीएमए हे ड्रग्ज सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्याच्यासाठी ऑर्डर द्यावी लागले. हायप्रोफाईल लोकांमध्ये या ड्रग्जला मोठी मागणी असल्यामुळे ते प्रचंड महाग मिळते. सलीम तलवार याने हे ड्रग्ज कुठून आणले होते आणि ते तो कोणाला विकणार होता याचा आता शोध घेत असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.