महामार्गावरील भरणे नाका येथे वाहतुकीची कोंडी, भीषण अपघाताची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उड्डाण पुलाचे रखडलेले काम, जगबुडी पुलाच्या जोडरस्त्यावर पडलेले मोठंमोठे खड्डे आणि महावितरणने सुरु केलेले पोल बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठीही कोणी नसल्याने या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चिपळूण दिशेकडून येणारी वाहने खेड शहरात यायला ज्या ठिकाणी वळतात, तिथला रस्ता खड्ड्यात गेला असल्याने वाहने चालवताना चालकांच्या पोटात खड्डा पडू लागला आहे. पाऊस थांबल्यावर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदार कंपनीने करणे आवश्यक होते. मात्र, महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीने रस्त्यावर पडलेले खड्डे अद्याप बुजविले नसल्याने या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगबुडी पुलाच्या जोडरस्त्यावर पडलेले खड्डेही असेच जीवघेणे असून या ठिकाणीही अपघाताची शक्यता नाकारत येत नाही.

खेड तालुक्याच्या हद्दीत कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या 44 कि. मी. च्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज इंफ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीकडून सुरु आहे. 44 कि. मी. च्या टप्प्यात जवळपास 80 टक्के चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र भरणे नाका येथील कामाला सुरुवातीपासून ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षी भरणे नाका येथे भुयारी मार्गासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता.

त्यामुळे भरणे नाका परिसरात वाहतुकीचा पुरता बोजबारा उडाला होता. काही महिन्यांनंतर ठेकेदाराने खोदलेला खड्डा भरण्यास सुरवात केली. त्यामुळे अनेकांना महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात नेमकं काय चाललं आहे? असा प्रश्न पडला. यानंतर महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी भुयारी मार्ग रद्द करून या ठिकाणी उड्डाण पुल बांधला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

गेले काही महिने या ठिकाणी रात्रंदिवस उड्डाण पुलाचे काम सुरु आहे, मात्र हे काम कूर्मगतीने सुरु असल्याने भरणे नाका परिसरात पुन्हा वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे. भरणे नाका हा परिसर नेहमीच पादचाऱ्यांनी गजबजलेला असतो. याच ठिकाणांहून महामार्गावरील हजारो वाहने मुंबई व गोव्याच्या दिशेने धावत असतात. जगबुडी पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्या वाहतुकीस योग्य असता तर कदाचीत एवढी वाहतूक कोंडी झाली नसती. परंतू पुलाचा जोडरस्ता खड्ड्यात गेला असल्याने जगबुडी पुलावर वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे.

उड्डाण पुलाचे सुरु असलेले काम आणि पुलाच्या जोडरस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला योग्य त्या सुचना कराव्यात अशी मागणी होत आहे. या परिसरात रस्त्याची झालेली दुरवस्था, रस्त्याच्या कडेला उभी राहिलेली अनधिकृत दुकाने, रस्त्यालागतचे गटार काढण्याचे सुरू असलेले काम आणि महावितरणने सुरू केलेले पोल बदलण्याचे काम यामुळे वाहतुक कोंडीत आणखी भर पडू लागली आहे.

भरणे नका येथे होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे निर्माण होणारी अपघाताची शक्यता लक्षात घेत या ठिकाणी वाहुकीला नियंत्रण करण्यासाठी पोलीस किंवा सुरक्षा रक्षक तैनात करणे गरजेचे आहे. मध्यंतरी माध्यमांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर या ठिकाणी वाहतुक नियंत्रण करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात केला जाईल अशी घोषणा खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केली होती. मात्र अद्याप या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कोणीही नसल्याने निशा जाधव यांच्या घोषणेचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.