हिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने भाव वधारला

42

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

तुम्ही चमत्कार केला की लोकं आपोआप तुम्हाला नमस्कार करतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. दोनच वर्षांपूर्वी ऍथलेटिक्सच्या ट्रॅकवर पाय ठेवणारी आसामची धावपटू हिमा दास हिने आपल्यातील नैसर्गिक गुणवत्तेला कर्तृत्वाची जोड देऊन अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले. मागील 19 दिवसांत आंतरराष्ट्रीय क्रीडापटलावर तिने पाच सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला अन् तिची ब्रॅण्ड व्हॅल्यू महिनाभरात दुप्पट झाली. हिंदुस्थानच्या ऍथलेटिक्स खेळासाठी ही नक्कीच दिलासा देणारी गोष्ट होय.

18 वर्षीय हिमा दासने अवघ्या 19 दिवसांत ऍथलेटिक्सचे मैदान गाजविताना 200 मीटर शर्यतीत चार, तर 400 मीटर शर्यतीत एक सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम करून तब्बल पाच वेळा युरोपच्या भूमीवर ‘जन गण मन’ची धून वाजविण्याची किमया केली. या लागोपाठच्या सोनेरी यशामुळे हिमा दास हिंदुस्थानची स्टार धावपटू ठरलीय. जिकडे तिकडे सध्या तिच्याच नावाचा बोलबाला सुरू आहे. हिमा ज्या आयओएस या स्पोर्ट्स मॅनेजमेंट फर्मची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर आहे, त्या फर्मने तिची वार्षिक ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट केली आहे. त्यामुळे आतापर्यंत 30-35 लाख रुपये मिळणार्‍या हिमा दासला यापुढे 60 लाख रुपये मिळणार आहेत. ‘आयओएस’चे व्यवस्थापकीय संचालक नीरव तोमर यांनी ही माहिती दिली. हिंदुस्थानमध्ये फक्त क्रिकेटपटूंचीच ब्रॅण्ड व्हॅलू अधिक असते.

सचिनच्या फोनने भारावली!

हिंदुस्थानची धावपटू हिमा दास हिने आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत 19 दिवसांत पाच सुवर्णपदकाची कमाई केल्याने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक महत्त्वाच्या सेलिब्रेटींनी तिचं अभिनंदन केलं आहे. मात्र, विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने हिमाला स्वतः फोन करून तिचं कौतुक केल्याने आसामची ही धावपटू भारावून गेली. स्वतः हिमाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजकर ही माहिती दिली आहे. तुमचे कौतुकाचे शब्द माझ्यासाठी मोलाचे आहेत, या प्रेरणेतून ऑलिम्पिकचे तिकीट बुक करण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावीन, असे आश्वासन हिमाने ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरला दिले.

19 दिवसांतील सोनेरी कामगिरी

  • 2 जुलै, पोजनान ऍथलेटिक्स ग्रां. प्री. स्पर्धेत 200 मी. 23.65 सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.
  • 7 जुलै, कुटनो ऍथलेटिक्स मीट स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत 23.97 सेकंदासह सुवर्ण.
  • 13 जुलै, झेक प्रजासत्ताक येथे क्लांदो ऍथलेटिक्स 200  मीटर शर्यतीत 23.43 सेकंदासह सुवर्ण.
  • 18 जुलै, झेक प्रजासत्ताक टबोर ऍथलेटिक्स मीट, 200 मीटर शर्यतीत 23.25 सेकंदांसह सुवर्ण.
  • 20 जुलै, झेक प्रजासत्ताक नोके मेस्टोनाड मेटुजी ग्रां. प्री.  400 मीटर शर्यतीत 52.09 सेकंदांसह सुवर्णपदक.
आपली प्रतिक्रिया द्या