एक लाखाच्या स्कुटरला 14 लाखांची नंबर प्लेट

हौसेला मोल नाही, असं म्हणतात तेच खरं. हिमाचल प्रदेशातील एका तरुणाने असंच काहीसं काम केलंय. हमीरपूर येथील रहिवाशी असलेल्या संजीव कुमार यांनी आपल्या 1 लाखाच्या स्कुटीला 14 लाखांची नंबर प्लेट लावली. काय विश्वास बसत नाही ना… पण हे खरं आहे.

संजीव कुमार यांनी परिवहन विभागाच्या लिलावात भाग घेतला आणि 14 लाख रुपये खर्च करून त्यांच्या स्कुटीसाठी एचपी21सी-0001 हा नंबर मिळवला. ऑनलाईन लिलावात फक्त 2 बोली लावणाऱयांनी भाग घेतला. दुसरा बोली लावणारा सोलन जिह्यातील होता, ज्याने 13.5 लाख रुपये देऊ केले होते. पण संजीव कुमारने पूर्ण 14 लाख रुपये देऊन बोली जिंकली.

लिलावात विशेष नंबर जिंकल्यानंतर संजीव कुमार म्हणाले की, त्यांना विशेष नंबर गोळा करण्याची आवड आहे. यामुळेच त्यांना त्यांच्या नवीन स्कुटीसाठी व्हीआयपी नंबर मिळाला आहे. पॅशनची किंमत नसते. संजीव यांचा मुलगा दिनेश कुमार म्हणाला की, शर्यतीत केवळ दोन जण होते. आम्ही हा नंबर पूर्णपणे पारदर्शक प्रक्रियेद्वारे मिळवला आहे. सोशल मीडियावर लाखमोलाची नंबर प्लेट व्हायरल होताच, बऱयावाईट कमेंट येत आहेत. काहींनी संजीव कुमार यांच्या पॅशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.