ढगफुटीनंतर हिमाचलमध्ये हाहाकार, अन्न-औषधांचा प्रचंड तुटवडा; अनेक महामार्ग बंद

हिमाचल प्रदेशात ढगफुटीनंतर महापुरामुळे प्रचंड विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या महापुरात अनेक घरे, दुकाने वाहून गेली असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. परिस्थिती आणखी बिकट असून मंडीपासून 50 किमी अंतरावर असलेल्या चौहार खोऱ्यात झालेल्या ढगफुटीमुळे आरंग नाला पाण्याखाली गेला. त्यानंतर आजूबाजूची गावे पाण्याखाली गेली.

ढगफुटी होऊन पाच दिवस झाले. मात्र, अद्याप येथील परिस्थिती सावरली गेलेली नाही. नागरिकांना तत्काळ मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. केंद्राकडून आर्थिक मदत जाहीर केली गेली असली तरीही ती मिळण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ढगफुटीमुळे आलेल्या महापुरात, चिखल, दगड मातीच्या लोंढय़ात दुकाने वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले. स्थानिक रहिवासी जितेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची चार दुकाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून दुकानात सुमारे दोन ते अडीच लाखांचा माल होता. अवघ्या 4 तासांत सर्वकाही उद्ध्वस्त झाले, असे टाहो फोडत ते सांगत होते. दरम्यान, येथील अनेक गावांचा शहरांशी संपर्क तुटला असून अन्नाचा आणि औषधांचा मोठा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे.

घर राहिले नाही, पावसामुळे उत्पन्न नाही, सर्व काही वाहून गेल़े  अशा परिस्थितीत जगायचे कसे असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला. मंडीतील परिस्थिती तर अत्यंत भयानक आहे. गावकरी जीव मुठीत घेऊन जगत असून अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे, असे सांगत केंद्र सरकारविरोधात अनेकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.