आयटीबीटी जवानांचा पराक्रम, 22,222 फुटांवर असणाऱ्या लियो पारगिलवर फडकवला तिरंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीटी) जवानांनी भीम पराक्रम करत 22 हजार 222 फुटांवर असणाऱ्या लियो पारगिल टेकडीवर तिरंगा फडकवला. लियो पारगिल हिमाचल प्रदेशमधील सर्वात उंच टेकडीपैकी एक आहे. आयटीबीटीच्या 16 जवानांच्या पथकातील 12 जणांनी या टेकडीवर पोहोचत विक्रम केला. विशेष म्हणजे कोरोना संकटकाळात कोविड-19 च्या नियमांचे पालन करत जवानांनी ही कामगिरी केली.

आयटीबीटी जवानांचे हे पथक 20 ऑगस्टला शिमला येथील हेडक्वार्टरमधून रवाना झाले होते. 31 ऑगस्टला डिप्टी कमांडंट कुलदीप सिंह यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल प्रदीप नेगी, काको केदारता, अनिल नेगी आणि आशिष नेगी यांनी ही टेकडी सर केली. याच पथकातील अन्य 7 सदस्य मंगळवारी 1 सप्टेंबरला दुपारी 11 वाजून 30 मिनिटांनी धर्मेंद्र ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली शिखरावर पोहोचले आणि तिरंगा फडकवला.

सर्वात कठीण मोहिमेबाबत बोलताना आयटीबीटी जवानांनी सांगितले की, लियो पारगिल हिंदुस्थानमधील सर्वात कठीण आणि तांत्रिक दृष्ट्या चढाईसाठी सर्वात अवघड टेकडीपैकी एक आहे. हिमाचलच्या लाहोल-स्पीती भागात ही टेकडी आहे. या भागात ऑक्सीजनची कमतरता असून कडाक्याची थंडी आणि उंचाहर गेल्यावर आरोग्यावर होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

दरम्यान, या पथकातील कॉन्स्टेबल प्रदीप नेगी यांनी दुसऱ्यांदा लियो पारगिल सर केले आहे. तसेच जगातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवर देखील ते दोनदा तिरंगा फडकावून आले आहेत.