हिमालयाच्या जंगलातील आगीमुळे पर्वतांवरील बर्फ गायब

डिसेंबरच्या थंडीत हिमालयातील जंगलात आग भडकली आहे. त्यामुळे उत्तरेकडे वायू प्रदूषणाचा धोका आणखी वाढला आहे. बागेश्वर, चमोली, गोपेश्वर आणि उत्तराखंडच्या आसपासच्या भागात आग सतत पसरत आहे. बागेश्वरच्या गढखेत रांगेतील रियुनी, लखमार आणि बगोटिया जंगलातही आग पसरली आहे. चमोलीतील पोखरी आणि अल्मोरा येथील रानीखेत भाग आगीने कवेत घेतला आहे. आग मोठय़ा प्रमाणात पसरली असून ती नियंत्रित करणे कठीण होत असल्याचे गढखेत वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कांडपाल यांनी सांगितले.

दोन महिन्यांपासून पर्वतांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव थांबला आहे. बर्फाच्छादित हिमालयीन पर्वत, जे सामान्यतः बर्फाच्छादित असतात ते आता दिसत नाहीत. दिवसा काही ठिकाणी तापमान 26 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. जंगलातून निळा धूर येत आहे. हा प्रदूषणाचा थर आहे. पर्यावरण तज्ञांच्या मते, बायोमास जाळल्याने प्रदूषण वाढते. हवेतील प्रदूषक घटक काढून टाकण्यासाठी लवकरात लवकर पाऊस पडणेदेखील आवश्यक आहे.

प्रदूषण वाढले, दृश्यमानता घटली

स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱया देहराडून येथे कानपूर व पाटणापेक्षाही जास्त प्रदूषण आहे. मंगळवारी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 300 च्या पुढे व शुक्रवारी 200 वर राहिला. धुक्यामुळे मसुरी व नैनितालसह प्रमुख पर्यटनस्थळांवर दृश्यमानता घटली. जंगलांमधून येणारा धूर खाली असलेल्या दऱयांमध्ये पसरत आहे.