हिंदमाता पूरमुक्तीसाठी पाच भूमिगत टँक, पालिकेचा मुंबईतील पहिलाच महत्त्वाकांक्षी उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र भगत

‘हिंदमाता’ परिसरात दरवर्षी अतिवृष्टीत पाणी तुंबल्यामुळे होणाऱया गैरसोयीतून सुटका करण्यासाठी पालिका जवळच्याच दोन मैदानांवर दोन मोठे भूमिगत टँक आणि ब्रिजच्या खाली तीन छोटे टँक बांधणार आहे. पाऊस आणि भरती ओसरल्यानंतर हे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून नजीकच्या नाल्यांमधून नदी-समुद्रात सोडण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली. मुंबईतील पहिल्याच प्रकल्पाचे काम पावसाळ्याआधी पूर्ण होणार आहे.

पालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ विभागातील हिंदमाता परिसर हा मोठय़ा रहदारीचा परिसर आहे. या परिसरात असणाऱया मोठय़ा रुग्णालयांसह अनेक बडय़ा कार्यालयांमुळे नेहमीच गर्दी असते. मात्र हिंदमाता परिसर खोलगट भाग असल्यामुळे तासाभराच्या पावसानेही या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. या ठिकाणी मोठा नाला नसल्याने पाण्याचा निचराही होत नाही. अतिवृष्टीत समुद्राला भरती आल्यास मोठय़ा प्रमाणात पाणी साचते. यामुळे प्रवासी-नागरिक, दुकानदारांची मोठी गैरसोय होते. शिवाय सोशल मीडिया-प्रसारमाध्यमांतही या प्रकारावरून पालिकेला मोठय़ा टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिंदमाता परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका करण्यासाठी पालिका भूमिगत टँक उपक्रम राबवत आहे.

टोकियोच्या धर्तीवर काम

टोकियोत अशाच प्रकारे भूमिगत टँक बनवण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी पालिकेचे पथक गेले होते. आता टोकियोच्या धर्तीवर मुंबईतही भूमिगत टाक्यांमध्ये पाणी साठवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीप्रसंगी भूमिगत टाक्यांत पाणी साठवण्याचा उपक्रमाबाबत माहिती दिली होती. यानुसार आता हिंदमाता या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याची यशस्विता पाहून मुंबईत इतर पाणी तुंबणाऱया ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

असे होणार काम

हिंदमाता परिसरातील प्रमोद महाजन गार्डन आणि सेंट झेवियर्स फुटबॉल मैदानाच्या खाली टँक बनवून वर पुन्हा मैदान बनवले जाईल. तर फ्लायओव्हरच्या खाली 3 छोटे टँक बनवून पाण्याचा उपसा केला जाईल. या कामासाठी 130 ते 140 कोटींचा खर्च केला जाणार आहे.