
त्रिभाषा समितीचे मत काय आहे हे मला माहीत नाही. माझे वैयक्तिक मत असे आहे की,पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, अशी स्पष्ट भूमिका त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत मांडली.
त्रिभाषा समिती जो अहवाल देणार आहे त्याकडे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण दक्षिणेकडच्या राज्यांनी आम्हाला तिसरी भाषा नकोच असे सांगितले आहे अशी माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.
त्रिभाषा समितीची संवाद बैठक आज रत्नागिरीत पार पडली. त्याबैठकीनंतर त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, एका ठिकाणी बसून समितीचा अहवाल देण्यापेक्षा आपण महाराष्ट्रात फिरून मतं जाणून घेण्याचा आम्ही विचार केला. राज्यात आम्ही आठ ठिकाणी बैठका घेणार आहोत. आजच्या बैठकीत अनेक शिक्षक आणि नागरिकांनी पहिलीपासून हिंदीची सक्ती नको म्हणून सांगितले. काहींनी हिंदी भाषेचे मराठीवर आक्रमण होईल, असे सांगितले आणि काहींनी हिंदी भाषा रत्नागिरी जिह्यात लोप पावत असल्याचे सांगितले. काही मंडळींनी हिंदी भाषा सक्तीचे समर्थनही केल्याचे डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले. आजच्या बैठकीला शिवसेना उपनेते, माजी आमदार बाळ माने, मनसेचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनीही आपली मते मांडल्याने एक परिपूर्ण बैठक पार पडल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
पुढे बोलताना डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, अनेक वेळा बोलीभाषेमुळे प्रमाण भाषा उच्चारताना ण चा न होतो किंवा ळ चा ल होतो त्यासाठी आम्ही भाषा प्रयोगशाळा सुरू करायचा विचार मांडत आहोत. हसतखेळत याप्रयोगशाळेत शब्दांचे उच्चारण होईल असे ते म्हणाले.
अशी सक्ती नको
समितीसमोर शिवसेनेची परखड भूमिका
आम्ही जेव्हा शिक्षण घेतले तेव्हा हिंदी भाषा पाचवीपासून होती. आजही हिंदी भाषा पाचवीपासून सुरू आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, मात्र अशी हिंदी भाषेची सक्ती नको अशी परखड भूमिका शिवसेना उपनेते बाळ माने यांनी बैठकीत मांडली. पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती नको अशी ठाम भूमिका मांडताना पक्षाच्या वतीने निवेदन दिले.
भाषा प्रयोगशाळा उभारा
पहिली पासून हिंदीची सक्ती नको असे ठाम मत उपस्थितांपैकी अनेकांनी मांडले. पहिल्यापासून मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषा असताना तिसरी भाषा सक्तीची केली तर विद्यार्थावर भार पडेल असे मत अनेकांनी मांडले. भाषा शिकण्यासाठी शाळांना भाषा प्रयोगशाळा द्या अशी मागणी शिक्षकांनी केली.

























































