
सामना प्रतिनिधी । अंबड
शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या मार्गावर प्रवेशद्वार लावण्याच्या कारणावरून हिंदू व मुस्लिम समाजात रविवार, ८ जुलै रोजी रात्री तणाव निर्माण झाला असून, शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून, ८० ते १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नगर परिषदेजवळ असलेल्या रस्त्याला काही वर्षांपूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेमार्ग नाव देण्यात यावे, असा ठराव सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्या रस्त्यावर ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेमार्ग’ असा फलकसुद्धा लावण्यात आला आहे. याच मार्गावर विनापरवाना शहीद-ए-हिंद हजरत टिपू सुलतान प्रवेशद्वार सौजन्य टिपू सुलतान ग्रुप, अंबड असा डिजिटल बोर्ड लावण्याचे काम सुरू केले होते. मात्र, त्या ठिकाणी चार नगरसेवक आले आणि त्यांनी काम बंद करण्याचे सांगितले. त्यामुळे वाद झाला. नंतर दोन्ही बाजूंनी ८० ते १०० तरुण हे वाहनातून घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक एल.डी. सोन्ने, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, जमादार पाचारणे, जे.पी. पिल्ले, कन्हैया भंडारकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांची समजूत काढली. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वाद न होता अनर्थ टळला.
या प्रकरणी अंबड पोलीसांत नगर परिषद सफाई कामगार भरत जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने करीत आहेत.
एकाच मार्गाला दोन नावे देता येत नाहीत – मुख्याधिकारी
नगर परिषद एकाच मार्गाला दोन महापुरुषांचे नाव देऊ शकत नाही. मात्र, हे कसे झाले मला अद्याप माहीत नाही. दोन्ही फाईल तपासल्यानंतरच समजेल, असे मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांनी सांगितले. मार्गाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग नाव दिलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दुसरे नाव नको, असे आमचे म्हणणे आहे. मात्र, काल रात्री अचानक त्या ठिकाणी प्रवेशद्वार उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. इतर कोठेही प्रवेशद्वार उभारण्यात यावे. त्याला आमचा विरोध नाही, असे स्वीकृत नगरसेवक संदीप खरात यांनी सांगितले.




























































