हिंदुस्थानने ‘सुखोई’ विमाने बनवली; मग ‘राफेल’ का नाही, ‘एचएएल’च्या माजी प्रमुखांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेल जेट फायटर’ विमानांच्या सौद्याच्या करारावरून काँग्रेसच्या माजी आणि भाजपच्या विद्यमान संरक्षणमंत्र्यांमध्ये जुंपली असतानाच ‘‘आपण ‘सुखोई’सारखी विमाने बनवू शकतो. मग राफेल का बनवू शकत नाही?’’ असा सवाल ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.’चे माजी प्रमुख टी. सुवर्णा राजू यांनी केला आहे.

राजू यांच्या या सवालामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची आणखी गोची झाली असून मोदी सरकारला घेरणाऱया काँग्रेसला आणि विरोधी पक्षांना चांगलेच बळ मिळाले आहे. ‘द सॉल्ट’ कंपनीसोबत योग्य करार वेळीच झाला असता तर राफेल विमानांची निर्मिती फ्रान्सऐवजी हिंदुस्थानातच झाली असती, असेही ‘एचएएल’चे माजी प्रमुख राजू यांनी ठासून सांगितले आहे. राफेल विमानांची निर्मिती हिंदुस्थानात होणे महत्त्वाचे होते, असे सांगून ते म्हणाले की, हिंदुस्थानात राफेल विमाने बनवणे थोडेफार खर्चिक ठरले असते. कदाचित फ्रेंच शास्त्र्ाज्ञांपेक्षा आम्हाला जास्त वेळ लागला असता, पण ते स्वाभाविक होते. कारण फ्रेंच शास्त्र्ाज्ञ अनेक वर्षे राफेल विमाने बनवत आहेत. तशा विमानांची निर्मिती हिंदुस्थानात खूपच कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे राफेलची निर्मिती आपल्या देशात होणे गरजेचे होते. त्यातून त्या विमानांसाठीचे तंत्रज्ञान आपल्या हाती लागले असते.

‘राफेल’ कराराशी संबंधित माहिती केंद्र सरकार जाहीर का करत नाही? प्रत्येक विमानावर खर्च किती याचा विचार करण्यापेक्षा त्या विमानांचे आयुर्मान किती हे पाहिले पाहिजे. दूरगामी विचार करता हिंदुस्थानी राफेल स्वस्त पडले असते आणि त्याबाबतीत आपण स्वावलंबी झालो असतो.
– टी. सुवर्णा राजू, माजी ‘एचएएल’प्रमुख

संरक्षणमंत्री सीतारामन यांनी राजीनामा द्यावा
‘राफेल’ची निर्मिती करण्यात हिंदुस्थान सक्षम होता, हे ‘एचएएल’चे माजी प्रमुख टी. सुवर्णा राजू यांनी जाहीररीत्या सांगितल्यामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा खोटारडेपणा पुन्हा उघडा पडला आहे. त्यामुळे त्यांनी आता पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. राहुल गांधी यांनी माजी ‘एचएएल’प्रमुखांनी केलेल्या दाव्याचे वृत्त ‘टॅग’ करून केलेल्या ‘ट्विट’मध्ये सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी संरक्षणमंत्र्यांची संभावना ‘राफेल मिनिस्टर’ अशी करतानाच राफेल डीलमधील भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचा आरोपही केला आहे.