
JNU मधील मारहाणीची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने स्वीकारली असून या संस्थेचे अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. असे असले तरी हल्लेखोरांची नावे जाहीर करण्याल मात्र पिंकी चौधरी यांनी नकार दिला. JNU च काय या देशातील कोणत्याही विद्यापीठात अशा प्रकारे देशविरोधात वातावरण तयार केले जात असेल तर त्यांना अशाच पद्धतीने पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी JNU हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. JNU हा कम्युनिस्टांचा अड्डा बनला आहे. देशविरोधी घोषणा देऊन लोक स्वत:ची महत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आपल्या देशासाठी अत्यंत घातक आहे, हे या पिढीला कळत नाही, असे चौधरी म्हणाले. देशातील तरुणांना देशविरोधी बोलल्यास प्रेरित करून प्रसिद्धी दिली जात आहे. आणि अशा प्रकारे तरुणांची दिशाभूल करून त्यांना राजकारणात आणलं जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. ज्यादेशात जन्म घेतला, शिक्षण घेतलं, त्याच देशाच्या विरोधात बोलण कितपत योग्य? असा सवाल त्यांनी केला आहे.
JNU दहशतवाद्यांचा अड्डा बनला असून ज्या प्रकारचा देशविरोधी प्रचार JNU मधून चालवला जात आहे ते आम्हाला सहन होत नाही. अशा गोष्टी यापुढे खपवून घेतल्या जाणार नाही. आमच्या देशात राहून देशविरोधी कारवाया केल्या जात असतील तर त्याला अशाच प्रकारे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी पुन्हा एकदा दिला.
या देशातील वातावरण काय आहे ते आम्हाला पाहायचं होतं. देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांना विरोधी पक्ष समर्थन देत आहे. हे एक प्रकारचे षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

























































