
गोरगरिबांना टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तुच्या किट वाटपात बाजु ऐकून न घेता कळमनुरी येथील नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची अन्यायकारक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यामुळे जिल्ह्यातील पाचही नगर पालिकेच्या 890 कर्मचाऱ्यांनी आज 22 मे रोजी काम बंद केले आहे. सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून केलेल्या आंदोलनामुळे जिल्हयातील पाचही नगर पालिकांचे कामकाज आज दिवसभर ठप्प होते.
औंढा नागनाथ मंदिर संस्थानच्या वतीने सल्लागार समितीचे अध्यक्ष व शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कोरोनाच्या टाळेबंदीच्या कालावधीत गोरगरिबांसाठी जीवनावश्यक वस्तु व धान्याच्या प्रत्येकी 500 किट हिंगोली, वसमत, सेनगाव व कळमनुरी येथे उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानुसार कळमनुरी शहरासाठी 23 एप्रिल रोजी 500 किट देण्यात आल्या. कळमनुरी येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी या किट गोरगरीब नागरिकांना दिल्या. मात्र, पोटदुखी झालेल्या काहींनी या प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. या अहवालाचा आधार घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळमनुरी नगर पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्याचे आदेश कळमनुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांनी ही अन्यायकारक कार्यवाही असल्याचे सांगत असंतोष व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने हे निलंबनाचे आदेश मागे घ्यावेत अशी मागणी नगर परिषद पालिका कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसतांना देखील बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हा आदेश रद्द करावा या मागणीसाठी हिंगोली, कळमनुरी, वसमत नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह औंढा नागनाथ व सेनगाव नगर पंचायतीच्या सुमारे 800 कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी काम बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे पाचही पालिकांचे कामकाज ठप्प झाले.
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे आज पाणी पुरवठा झाला नाही तसेच सर्व शहरांमधून फिरून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या देखील बंद होत्या. शहर स्वच्छतेची कामेही झाली नाहीत. कामासाठी आलेल्या नागरीकाना कर्मचारी नसल्याने परत जावे लागले. नगर परिषद कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डी. पी. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असून या परिस्थितीमध्ये नगर परिषद कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. किट वाटप प्रकरणात कळमनुरी पालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये कुठलाही संबंध नसतांना देखील दोघांवर केली जाणारी निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे. जिल्हा प्रशासनाने निलंबनाचे आदेश मागे घ्यावेत. अन्यथा नगर परिषद कर्मचारी राज्यभरात आंदोलन छेडतील असा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी. पी. शिंदे यांनी दिला आहे.



























































