
सोलापूर ते हिंगोली असा प्रवास करून आलेल्या एसटी बस चालकाचा हिंगोली बस स्थानकातील जुन्या विश्रांतीकक्षात मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या घटनेने बसस्थानक परिसरात कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुका राळेगाव येथील सुरेश सदाशिव सलामे (56) ह.मु. रिसाला बाजार, हिंगोली हे मागील काही वर्षांपासून हिंगोली आगार येथे चालक या पदावर कार्यरत आहेत. दरम्यान 4 ऑक्टोंबर रोजी सुरेश सलामे हे हिंगोली- सोलापूर बस घेऊन गेले होते. 5 ऑक्टोंबर रोजी सोलापूर -हिंगोली प्रवासी घेऊन निघाले होते. सुरेश सलामे यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे त्यांनी प्राथमिक उपचार घेऊन थोडे बरे वाटल्यानंतर बस घेऊन हिंगोलीकडे निघाले होते. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास प्रवाशांना हिंगोली बस स्थानकात सुखरुप आणून सोडले. अस्वस्थ वाटू लागल्याने बसस्थानकाच्या जुन्या विश्रांतीकक्षात असलेल्या पेट्यावर जाऊन झोपले होते. रात्री उशिराने बाहेरील आगाराची कोणतीही बस न आल्यामुळे विश्रांतीकक्षाकडे कोणीही गेले नाही. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कर्मचारी गेल्यानंतर सुरेश सलामे हे मृतावस्थेत आढळून आले. या घटनेनची माहिती मिळताच आगारप्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक नियंत्रक एफ.एम. शेख, कर्मचारी मुकेश ठोंबरे, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, जमादार संजय मार्के, अशोक धामणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयत सुरेश सलामे यांचा मृतदेह हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर सुरेश सलामे यांचा मृतदेह यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या गावी राळेगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे.






























































