
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याच्या दोन्ही चाचण्या 14 दिवसानंतर निगेटिव्ह आल्या आहेत. आज 17 एप्रिल रोजी कोरोनावर मात केलेल्या या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजून या रुग्णाला निरोप दिला.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील एकाला कोरोनाची लागण झाल्यावर त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, डॉ. गोपाल कदम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार केले. 14 दिवसानंतर या रुग्णाच्या घशातील लाळेचे घेतलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यामुळे हा रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. आज 17 एप्रिल रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयातून या कोरणा मुक्त रुग्णाला सुट्टी देण्यात आली. तसेच पुढील 14 दिवस घरी कॉरंटाईन राहण्याच्या सूचना देखील या रुग्णाला देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
परभणीतील रुग्णाच्या संपर्कात हिंगोलीचे सहा जण
परभणी येथे आढळून आलेला कोरोना बाधित रुग्ण मुळचा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रहिवासी असला तरी सध्या परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होता. परभणीतील या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील त्याचे चार नातेवाईक तसेच सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील दोन जण आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. सेनगाव तालुक्याच्या पुसेगाव येथील 2 जण परभणी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत पुण्याहून मोटरसायकलद्वारे प्रवास करून आल्याचेही सांगण्यात आले असून या दोघांचा पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेकडून शोध घेतला जात आहे.


























































