
मिंधे गटाचे आमदार असलेले संतोष बांगर यांच्या दादागिरीचे किस्से प्रसिद्ध आहेत. आता पुन्हा ते एका नव्या वादात अडकले आहेत. बांगर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगार प्रमुखांना धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल हो आहे. एसटीच्या वाहकाला मारहाण करण्याची धमकी बांगर यांनी आगार प्रमुखांसमोर दिली आहे.
हिंगोलीतील कळमनूरीचे आमदार असलेल्या संतोष बांगर यांच्या कडे काही महाविद्यालयीन विद्यार्थीनी एसटी वाहकाची तक्रार घेऊन गेल्या होत्या. त्यांची तक्रार ऐकल्यानंतर बांगर संतापले. त्यांनी एसटी आगाराच्या प्रमुखांना बोलावून घेतले व सर्वांदेखत त्यांना झापले. तसेच विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या बस वाहकाला मारहाण करण्याची धमकी त्यांनी यावेळी दिली.
हिंगोली येथील शाळा आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस आहे. परंतु, ही बस बऱ्याचदा उशिराने सोडली जाते, अशी तक्रार घेऊन डिग्रस, हिवरा, बोरजा, लिंबाळा, दुघाळा, पिंपरी येथील विद्यार्थीनींनी थेट आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्यासमोर तक्रारी मांडल्या. तसेच बस वाहक त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.




























































