अकरा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्यास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

वसमत तालुक्यातील परजना येथे पैशांसाठी एका 11 वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्याला कुरुंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव विष्णू गायकवाड (11) असे मुलाचे नाव आहे.

वसमत तालुक्यातील परजना येथे राहणारा वैभव गावातील मारुती मंदिराजवळ इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचवेळी गावातीलच ज्ञानेश्वर सूर्यभान कराळे याने त्याचे अपहरण केले. त्यानंतर कराळे यांनी वैभवच्या वडीलांना फोन केला व पैशाची मागणी केली. याबाबत विष्णू गायकवाड यांनी तात्काळ कुरुंदा पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या पथकाने येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर वैभवचा शोध सुरू झाला.

याचदरम्यान, हिंगोली शहरातील अकोला बायपास येथे ज्ञानेश्वर कराळे हा वैभवला घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर वैभवला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, उत्तर प्रदेश बिहार या राज्यात दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटना घडत असतात. हिंगोली जिल्ह्यात अशाच घटना घडत असल्यामुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.