दिल्लीत फडकला महाराष्ट्राचा झेंडा

53

सामना प्रतिनिधी। हिंगोली

कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे चिज झाले आहे. राष्ट्रीय स्वच्छ विद्यालयाचा २०१८ चा पुरस्कार पटकावतांनाच या शाळेने महाराष्ट्रातून प्रथम तर देशातून १७ वा क्रमांक मिळविला आहे. कळमनुरीच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार स्विकारला.

कळमनुरी तालुक्याच्या गोटेवाडी गावातील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अवचार यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा परिसर, स्नानगृह, शौचालय, हॅण्डवॉश स्टेशनची स्वच्छता राखली. जिल्हास्तर, विभागस्तर असे टप्पे पार करत महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्वच्छ विद्यालयाच्या स्पर्धेत उतरलेल्या ४० शाळांमध्ये गोटेवाडीच्या शाळेने स्थान मिळविले. जून २०१८ मध्ये केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या पथकाने पाहणी व सर्वेक्षण केले. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी गोटेवाडीच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा महाराष्ट्रातून प्रथम तर देशातून १७ वा क्रमांक आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, दिल्लीत केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

आपली प्रतिक्रिया द्या