हिंगोली जिल्ह्यात 55 उमेदवारांचे अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली व कळमनुरी या तीन विधानसभा मतदारसंघातुन 55 इच्छुक उमेदवारांनी 84 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बसपा, सपा यासह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

वसमत मतदारसंघातुन 23 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. वसमतमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे, वंचित बहुजन आघाडीचे मुनीर पटेल यांचा समावेश आहे. हिंगोली मतदारसंघामध्ये 17 उमेदवारांनी 26 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा भाजपा आमदार तानाजी मुटकुळे, काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचित बहुजन आघाडीचे वसीम देशमुख, प्रहार जनशक्तीचे अ‍ॅड. विजय राऊत यांचा समावेश आहे. तर कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये 20 उमेदवारांनी 30 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे, अजीत मगर यांचा समावेश आहे. आजपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांनी पक्षाकडुन व अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे प्रत्यक्षात 55 उमेदवार रिंगणात उतरल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.