
सामना प्रतिनिधी । हिंगोली
बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या विदर्भातील पोहरा देवी येथे ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगाराकडून बससेवा सुरु करण्यात आली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच आज हिंगोली आगाराच्या व्यवस्थापकांना भेटून ही मागणी मान्य करुन घेतली आहे. यासोबतच ३ डिसेंबर रोजी पोहरा देवी येथे होणाऱ्या यात्रोत्सवासाठी ५ जादा बसगाड्या देखील सोडल्या जाणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत व हिंगोली या तालुक्यात बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत. विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी हे बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असुन या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने बंजारा समाज जातो. हिंगोलीहून पोहरा देवीसाठी सुरु असलेली बससेवा हिंगोली आगाराने मागील काही महिन्यापासुन बंद केली होती. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत होती. बंजारा समाज बांधवांनी ही अडचण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना सांगितली. त्यानुसार बांगर यांनी रा.प. मंडळाच्या हिंगोली आगार व्यवस्थापकांकडे बस सुरु करण्याबाबत मागणी केली.
जिल्हाप्रमुख संतोष बांगर, शिवसेना शहरप्रमुख अशोक नाईक, नगरसेवक प्रतिनिधी राम कदम, भानुदास जाधव, पं.स. उपसभापती गोपु पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन पोहरा देवीला ही बससेवा सुरु करण्याबाबत मागणी केली. उद्या २९ नोव्हेंबर पासुन सकाळी ८ वाजता हिंगोली बसस्थानकावरुन पोहरा देवीला जाण्यासाठी व परतीच्या प्रवासाकरिता बससेवा सुरु करणार असल्याचे आगार व्यवस्थापक चौतमल यांनी सांगितले. तसेच ३ डिसेंबर रोजी पोहरा देवी येथे मोठा यात्रोत्सवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या यात्रेला जाण्यासाठी जिल्ह्यातील बंजारा बांधवांची सोय व्हावी, यासाठी जादा बसगाड्या सोडण्यात याव्यात, असेही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सांगितले. त्यानुसार ५ जादा बसगाड्या ३ डिसेंबरला सोडण्यात येतील, असे सांगण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी बंद पडलेली बससेवा सुरु करुन दिल्याबद्दल बंजारा समाज बांधवांनी समाधान व्यक्त करुन शिवसेनेचे आभार मानले आहेत.































































