
सामना प्रतिनिधी। हिंगोली
येथील खासदार राजीव सातव हे काँग्रेसचे देश पातळीवरील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे सातव यांनी लोकसभेला लढायचे की नाही ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी ठरवतील. त्या विषयावर मी बोलू शकत नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी बुथ पातळीवरील संघटन मजबूत करा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संपत कुमार यांनी केले आहे. त्यामुळे सातव लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राहणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार डॉ. संतोष टारपे यांच्यासह जिल्हास्तरीय व तालुक्याचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, खासदार राजीव सातव यांच्या आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याबात जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सातव हे लोकसभा लढवणार नसल्याची बातमी पेरुन त्यावरच्या प्रतिक्रिया काय उमटतील हे जाणून घेण्याचाही डाव टाकून बघण्यात आला. तथापि, लोकसभा क्षेत्रात सातवांचा संपर्क कायम असून काँग्रेसकडुन पुन्हा तेच उमेदवार राहतील, असे त्यांच्या निकटवर्तियांकडुन सांगितले जाते. आढावा बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी या संबंधाने चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी सातव हे गुजरातचे प्रभारी असून त्यांच्यावर काय जबाबदारी द्यायची, लोकसभेला त्यांनी लढायचे की नाही हे पक्षाध्यक्ष राहुल गांधी ठरवतील आणि त्याप्रमाणे सातव हे पक्षासाठी काम करतील, असे सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सातव यांनी पक्षाच्या माध्यमातुन अनेकांना संधी देत पदापर्यंत पोहचविले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात खऱ्या अर्थाने लढ्याला सुरुवात झाली. त्या लढ्यातील प्रमुख शिलेदारापैकी एक राजीव सातव आहेत आणि तेथून सुरू झालेल्या लढ्याला पाच पैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता येऊन यश मिळाल्याचेही संपतकुमार यांनी बैठकीत सांगितले. दरम्यान, पक्षाच्या या महत्वाच्या बैठकीला माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची मात्र अनुपस्थिती होती.

































































