हिंगोलीत एसआरपीफचे 200 अधिकारी व जवान क्वारंटाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मुंबई व मालेगाव येथून हिंगोलीत दाखल झालेल्या 191 अधिकारी व जवानाना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या पथकाने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून मुंबई व मालेगाव येथे बंदोबस्ता करिता गेली होते. या कंपनीमध्ये मुंबईहुन परतलेले 84 तर मालेगावहुन आलेल्या 107 अधिकारी व जवानाचा समावेश आहे. काल 19 एप्रिल व आज 20 एप्रिल रोजी हे सर्व अधिकारी व कर्मचारी हिंगोलीत परतले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या सुचनेनुसार एसआरपीएफचे समादेशक मंचक इप्पर यांनी अधिकारी व जवानांना मार्गदर्शन करून पुढील चौदा दिवस क्वांरटाईन राहण्याच्या सुचना दिल्या. यावेळी समादेशक सहाय्यक आर. बी. जाधव उपस्थित होते.

जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. नारायण भालेराव, डॉ. संजीवन लखमावार, डॉ. स्वाती नुन्नेवार, डॉ. अरुण जीरवणकर, डॉ. दीपमाला पाटील आदीच्या पथकाने या सर्व 191 एसआरपीएफ जवान व अधिकाऱ्याचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या सर्व अधिकारी व जवानांची प्रकृती ठणठणीत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना घरीच क्वारंटाईन राहण्याच्या सुचना दिल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व समादेशक मंचक इप्पर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.