हुनरबाज इतिहासकार

91

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे… समस्त महाराष्ट्राला शहाजीराजे कळले ते या लेखणीतूनच… पण शिरीषदादांच्या लेखणीने केवळ इतिहासापुरतं सीमित न राहता मुक्त संचार केला आहे.

शिरीष गोपाळ देशपांडे या वल्लीला भेटले आणि वाटलं, छे, छे… या लेखकाला एका मुलाखतीत बांधण्याऐवजी किमान चार भागांत ती मुलाखत क्रमशः लिहिली तरच त्यांच्याबद्दल तसूभर तरी लिहिलं असं म्हणता येईल. कादंबरीकार, दिग्दर्शक, नाटककार, पत्रकार, संपादक, वक्ता, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक, ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, चित्रपट मालिकांचे पटकथा-संवाद लेखक, विज्ञान कवितेचे प्रणेते, विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्ष, पथनाटय़ाचे प्रवर्तक, 24 प्रकाशित आणि 36 अप्रकाशित पुस्तके लिहिणाऱया या माणसानं लिखाणाचं एकही क्षेत्र सोडलेलं नाही. ‘पत्रलेखन सोडून मला काहीही लिहिता येतं’ असं ते स्वतःच कबूल करतात. त्यांच्या पत्नीनं, साहित्यलक्ष्मीनं हसत हसत सांगितलं की, ते मला पत्र लिहायचे, पण मुद्दा क्रमांक 1, 2, 3 या स्वरूपात. नाव तरी बघा काय बायकोचं ‘साहित्यलक्ष्मी’. ते शिरीष दादांनी ठेवलं लग्नानंतर. त्यांचा प्रेमविवाह. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती ती आणि शिरीष दादा होते प्राध्यापक. त्यांना ज्या क्षणी ती कॉरिडोरमध्ये दिसली त्यावेळी पिवळी साडी आणि लाल ब्लाऊज असे कपडे परिधान केले होते तिनं. अजब कॉम्बिनेशन होतं ते. पण तिला पाहताच हीच आपली बायको याची त्यांना खात्री पटली. ‘वर्गात तिला पाहिल्यावर वरचा श्वास वर आणि खालचा खाली अशी माझी अवस्था झाली होती.’ शिरीष दादांनी हसत हसत सांगितलं, ‘तुमच्या प्रेम ‘कवितांचा जन्म’ या प्रेमकहाणीमुळे झाला का?’ हे मी मग विचारलंच. त्यावर साहित्यलक्ष्मी म्हणाल्या, ‘माझ्यावर एकही कविता त्यांनी लिहिली नाहीए अजून.’

साहित्यलक्ष्मी यांनी मला आग्रहानं जेवायला बसवलं होतं आणि एकीकडे आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्याआधी पन्ह देऊन त्यांनी माझं आणि फोटोग्राफरचं स्वागत केलं होतंच. फोटो काढतानासुद्धा ‘तुम्ही माझे फोटो लेखक म्हणून काढणार आहात की चित्रकार म्हणून?’ असा प्रश्न विचारून शिरीष दादांनी त्या फोटोग्राफरला गोंधळात टाकलं होतं. आपल्या विचारांनी आणि बुद्धीनं गगनभरारी घेणारे लोक त्या बुद्धीचा कुठलाही अहंकार न बाळगता सर्वांशीच कसं अगत्यानं आणि प्रेमानं बोलतात, याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा शिरीष दादांना भेटल्यावर मला आलं.. शब्दांचं गारुड करणारा हा माणूस, बोलण्याच्या ओघात, निरनिराळ्या कितीतरी कविता आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी सहज म्हणत होता. ‘दहा हजार उत्तम कविता पाठ आहेत माझ्या. म्हणूनच माझ्या कविता मला पाठ होत नाहीत’ असंही ते म्हणून गेले. अर्थातच जो त्यांचा विनय होता.

श्वासाइतके सहजतेनं येणारे शब्द आणि हृदयाच्या स्पंदना इतकीच असणारी गेयता, जगणाऱया शिरीष दादांचं लहानपण कसं गेलं याची उत्सुकता होतीच. ते म्हणाले, ‘लहानपणापासून घरात वातावरण राजकीय. घरातल्या सगळ्यांनी राष्ट्रकार्याला स्वतःला वाहून घेतलं होतं. आजोबांकडून टिळक आणि सावरकरवाद, वडिलांकडून सहिष्णुता आणि आईकडून झाशीच्या राणीचा संस्कार झाला माझ्यावर. पण घरात वाङ्मयविरोधीच वातावरण होतं. फक्त एकच गोष्ट माझ्या लिखाणाला पूरक ठरली, ती म्हणजे गाण्याच्या भेंडय़ा. मला नेहमी कच्चा लिंबू म्हटलं जायचं तेव्हा. जे मला आवडायचं नाही. कुठल्याही शब्दापासून आपल्यालाही गाणी म्हणता यावीत म्हणूनच रघुनाथ पंडित पाठ केले होते मी. त्यामुळेच असेल कदाचित, लिहावाचायला लागायच्या आधीच म्हणजे दोन वर्षांचा असतानाच मी कविता रचायचो आणि अर्थातच, लिहिता येत नसल्यामुळे रचलेली कविता पाठ करायचो. दुसरीत असताना पाठपोट कागदावर मी पहिलं नाटक लिहिलं होतं. ‘खेळ’ नावाचं.. नसते उद्योग आहेत हे असं म्हणत, एक दिवसाचं पाणी तापवण्यासाठी त्या कागदांना आईनं बंबात टाकलं होतं.

शिरीष दादा सांगत होते, ‘सहा वर्षांचा होईपर्यंत वर्ध्यालाच आजोबांकडे होतो मी. पुढे अंगण होतं. दुमजली घर होतं. आजोबांचं ऑफिस, त्यामागे वडिलांचं ऑफिस. दोघंही वकील. ते कोर्टात गेले की मी धुडगूस घालायचो घरात. विहीर होती त्या विहिरीत मध्यभागी जाऊन उभा राहायचो. आई खूप ओरडायची. थोडक्यात हूड होतो मी. माझ्या हूडपणामुळे वडील रागवायचे आणि काका पाठीशी घालायचे. नंतर वडिलांनी आशीर्वाद नावाचं तीन भागांचं मोठं घर बांधलं. 36 खोल्या होत्या त्याला. कोठीघर, स्वयंपाकघर, देवघर. मी लिहायला लागलो हे बघून वडिलांनी वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्रं आणि काकांनी मर्ढेकर हातात ठेवले. आशीर्वादमधला एक भाग आपल्याला लाभत नाही असं वडिलांना वाटत होतं, म्हणून त्यांनी तिथे भाडेकरू ठेवले. पण माझा त्या लाभण्या न लाभण्यावर विश्वास नव्हता. म्हणूनच त्या भाडेकरूची मुदत संपल्यावर मी तिथे राहिला लागलो, हट्टानं. तिथे रात्र रात्र मी गणितं सोडवायचो.

त्यांच्या विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्त्वाचा परिचय मला आता व्हायला लागला होता. ‘हीच ती जागा म्हणावी. काळ गेलेला पुढे. हीच ती तू ही म्हणावी, वाढले वय एवढे.’ अशी विज्ञान कविता, अशा तर्कशुद्ध विचारसरणीतूनच जन्माला आली असणार, असं मला वाटून गेलं. त्यांच्या अशा कवितांना ‘विज्ञान कविता’ हे नाव कवी अनिल यांनी ठेवलं. ग्रेस, यशवंत मनोहर यांच्या अध्यापनाचा लाभ मिळालेले शिरीष गोपाळ देशपांडे. त्यांच्या लिखाणाला बीएसस्सीमध्ये प्रतिभेचा बहर आला. एकीकडे गणित आणि दुसरीकडे मराठी अशा दोन विभिन्न विषयांची आवड तेवढीच तीव्र असताना गणितात एमएससी न करता मराठीत एमए करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ‘पण एमए नंतर माझ्या कवितेतली सहज, निरागसता संपली आणि ती खोटी झाली असं मला काही काळ जाणवलं. ‘हेही त्यांनी प्रामाणिकपणे आणि आवर्जून सांगितलं. त्यावेळी गणितातल्या निर्विवाद आणि रोखठोक, एकमात्र उत्तरासारखा त्यांच्या वागण्या-बोलण्यातला सच्चेपणा जाणवला. आधुनिक मराठी साहित्याची विज्ञान समीक्षा असा प्रबंध लिहिणारा हा माणूस, ‘युनिफाईड थिअरी ऑफ कॉस्मिक शुअर रिअलिटी’सारखं लेखन तितक्याच आवडीनं आणि अधिकारानं करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला थक्क व्हायला होतं. स्वतःच्या विज्ञाननिष्ठ वृत्तीला विज्ञान कवितांमधून, प्रतिभा आणि कल्पनाशक्तीला नाटक, चित्रपट, कथा-कादंबऱयांतून आणि शोधप्रवृत्तीला गुरुत्वाकर्षणासारख्या विषयावर प्रबंध लिहून सतत तेवत ठेवणारा हा बहुआयामी लेखक. बारा वर्षे नागपूरला अध्यापन करताना ते 321 शंकर नगरमध्ये एक मजला भाडय़ाने घेऊन राहत होते…जिथे खऱया अर्थानं त्यांचं लेखन सुरू झालं. ‘अरण्यकांड’, ‘वैकल्य’ यासारख्या कादंबऱयांचा जन्म तिथलाच. लिखाणासाठी स्वतंत्र खोली ठेवली होती त्यांनी तिथे. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक होण्याचं स्वप्न उराशी होतचं. म्हणूनच त्यांनी मुंबईला यायाच ठरवलं. पण पत्नीनं त्यांना बजावलं की, आर्थिक बाजू स्थिर होणारं काम मिळेल त्यावेळीच मुंबईत यायचं.

एसएनडीटीमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि मग त्यांनी स्थलांतर मुंबईला केलं. ‘आम्ही दोघं पहिल्यांदा राहायला आलो चाळीत. बाहेर संडास असणाऱया. खूपच त्रासदायक होतं ते. म्हणूनच कर्ज घेऊन एक छोटसं घर घेतलं. आणि मग अनेक घरं बदलत मी सध्याच्या या टू-बीएचकेमध्ये आलो. त्याचंही कर्ज रिटायर्ड झाल्यानंतर फेडलं आणि आता कर्जमुक्त झालो. मुलगा अभिषेक हा आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेता लीड गेम डिझायनर आहे आणि मुलगी ऊर्जा कोरिओग्राफर आहे. ‘त्यांना लिहिताना मग्न झालेलं पाहणं हा माझा आनंद आहे’ असं साहित्यलक्ष्मी म्हणतात. ‘लिटमस’, ‘स्वातंत्र्याचे मृत्युपत्र’ असे अनेक कवितासंग्रह’ ‘अरण्यकांड’, ‘शोध-प्रतिशोध’, ‘पाताळयंत्र’ अशा अनेक कादंबऱया, ‘राजा शहाजी’ ही प्रचंड गाजलेली महाकादंबरी, ‘कात्यायनी’ हे संगीत नाटक, ‘एप्सिलॉन’ हा विज्ञान कवितासंग्रह ‘राजा शिवछत्रपती’, ‘गोटय़ा’ अशा मराठी मालिका, ‘जाणता राजा (हिंदी)’, ‘राजा शिवछत्रपती’, यासारखं अनेकांसाठी गीतलेखन, असं प्रचंड लेखन करण्यात व्यग्र असणारा हा लेखक. ‘शहाजीजाई’ ही त्यांची आगामी कादंबरी. विज्ञान आणि अज्ञेयवाद यांच्यावर निष्ठा असणारे, राष्ट्रकार्यानं झपाटलेले, तरल शब्दांशी जवळीक साधणारे शिरीष गोपाळ देशपांडे आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा सत्कर्मासाठीच उपयोग करतात म्हणूनच अशक्य वाटणाऱया गोष्टीदेखील शक्य होऊन जातात.

 

आपली प्रतिक्रिया द्या