मुंबईच्या लाटांवर ‘संक रॉक’चा महासंग्राम! पुण्याच्या चैतन्य आणि दीक्षाचे वर्चस्व!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आयोजित ऐतिहासिक ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) तर्फे आयोजित या स्पर्धेत ६ राज्यांतील ३३७ जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता, ज्यापैकी ३३० जणांनी विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण केली.

प्रमुख विजेते आणि कामगिरी –

पुरुष गट (५ किमी): पुण्याचा चैतन्य शिंदे (३९:१५ मि.) याने सुवर्णपदक पटकावले.

महिला गट (५ किमी): पुण्याची दीक्षा यादव (३९:३३ मि.) सर्वात वेगवान महिला जलतरणपटू ठरली.

दिव्यांग गट (१ किमी): नाशिकची विभूती पाटील आणि बेळगावचा स्कंद घाडगे यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिद्दीचे दर्शन घडवले.

वयोगटानुसार विजेते –

स्पर्धेत ८ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग होता. १४-१५ वयोगटात सोहम खांबेकर आणि प्रिशा वर्मा, तर १२-१३ गटात क्रिश कुठे आणि ओवी चिंदरकर यांनी बाजी मारली. ७० वर्षीय महादेव तावरे यांनी आपल्या फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, खासदार अरविंद सावंत, पद्मश्री उदय देशपांडे आणि अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक स्पर्धेचे यशस्वी नियोजन करण्यात आले.