हार्वर्ड विद्यापीठावर ट्रम्प सरकारची मोठी कारवाई, आता करसवलत मिळणार नाही; वाचा कारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाचा करमुक्त दर्जा रद्द केला आहे. ज्यूंविरुद्ध वाढता द्वेष आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ होणारी निदर्शने रोखण्यात विद्यापीठ अपयशी ठरल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासन हार्वर्ड विद्यापीठावर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहे.

काही दिवसांआधी ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला एक पत्र लिहून विद्यापीठात व्यापक सरकारी, नेतृत्व सुधारणा आणि प्रवेश धोरणांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. कॅम्पसमध्ये विविधता आणण्यासाठी आणि काही विद्यार्थी क्लबची मान्यता रद्द करण्यासाठी सरकारने विद्यापीठाला ऑडिट करण्यास सांगितले होते. मात्र विद्यापीठाने ट्रम्प यांच्या मागणीवर आक्षेप व्यक्त केला आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष अॅलन गार्बर म्हणाले, ‘विद्यापीठ त्यांचे स्वातंत्र्य किंवा संवैधानिक अधिकार सोडणार नाही.’ दरम्यान, अमेरिकेत एखाद्या मोठ्या विद्यापीठाचा करमुक्त दर्जा पहिल्यांदाच संपवण्यात आला आहे.