
सामना प्रतिनिधी । नगर
जनजागृती मंच या सामाजिक संघटनेतर्फे महाराष्ट्रातील ऐतिहासिक बारवांच्या संवर्धनाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. या उपक्रमांतर्गत पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या वंशज महाराणी चंद्रावतीबाई होळकरांनी उभारलेली छत्री, पाण्यासाठी बांधलेल्या बारवेची स्वच्छता, देखरेख व सबलीकरणानंतर रविवार दि. 3 मार्च रोजी सकाळी 10 वा. जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते जलपूजन सोहळा होणार असून, याप्रसंगी अनाथांची माय ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ, आदर्श ग्रामयोजनेचे प्रेणेते आणि हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत.
पुण्यश्लोक बारव संवर्धन उपक्रमाचे अध्यक्ष रोहित पांडे, प्रमुख सहयोगी खटाव तालुका पंचायत समितीचे सभापती संदिप मांढवे, उपक्रमाचे नियोजनप्रमुख रमाकांत पांडे, सांस्कृतिक वारसा व्यवस्थापक आनंद कानिटकर, जालन्यातील समाजसेवक राजीव डोंगरे, रयत शिक्षण संस्थेचे संचालक अनिल पाटील आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या वंशज श्रीमंत महाराणी चंद्रावती होळकर या मूळ पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील रहिवासी असल्यामुळे त्यांनी त्या काळात येथील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची गरज पडू नये म्हणून पाच विहिरी व एक बारव होळकर संस्थांनच्या खर्चातून बांधल्या होत्या. या बारवेशेजारी महादेवाचे मंदिरही बांधले होते. या मंदिरावर होळकरांची छत्री बसविण्यात आली होती. मात्र अनेक वर्षानंतर या बारवेची दुरावस्था झाली आहे. विहिर व बारवेमध्येही गाळ साचून परिसरात दुर्गंधी पसरु लागली. मुंबई येथील जनजागृती मंच व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बारव संवर्धन समितीच्या सदस्यांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या बारवेची स्वच्छता व महादेव मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले. या उपक्रमासाठी हिवरे बाजरचे सरपंच पोपटराव पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे ढवळपुरी गावातील गावडेवाडी येथील ग्रामस्थांनीही श्रमदान करुन या उपक्रमात सहभाग नोंदविला.
नगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक ठिकाणी बारव व विहिरी होळकर संस्थांच्या खर्चातून बांधल्या आहेत. मात्र ढवळपुरी येथील गावडेवाडी परिसरातील या बारव व महादेव मंदिराला होळकरांची छत्री असल्यामुळे इतिहासात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. होळकर संस्थानात गावडेवाडी येथील कृष्णाराव गावडे यांना होळकरांच्या गादीवर दत्तक पुत्र म्हणून मान मिळाला होता. त्यामुळे या महादेव मंदिरासाठी होळकर संस्थानच्या तिजोरीतून अनेक वर्ष दिवा-बत्ती व दुरुस्तीसाठी मदत देण्यात येत होती.
बारव संवर्धन उपक्रमाच्या जलपूजन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सुधाकर गावडे, भागाजी गावडे, भाऊसाहेब गावडे आणि अशोक गावडे यांनी केले आहे.





























































