
मुंबईच्या हेरिटेज वैभवात भर घालणाऱया ऐतिहासिक वरळी किल्ल्याला लवकरच गतवैभव मिळणार आहे. पालिकेच्या माध्यमातून वरळी किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून परिसराचे सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे. याशिवाय किल्ल्याला कायमस्वरूपी रंगीबेरंगी लायटिंगही करण्यात येणार आहे. तसेच परिसरात सुरू, समुद्रफुल अशा प्रकारची झाडेही लावण्यात येणार असून ऐतिहासिक स्वरूपाची बेसॉल्ट दगडाची पायवाटही बनवण्यात येणार आहे.
मुंबईचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी आणि शहर स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहेत. या मोहिमेंतर्गत जी/दक्षिण विभागातील वरळी किल्ल्याचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्याच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येणाऱया वरळी किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्यावर असलेले पोर्तुगीजकालीन अवशेष दिमाखात उभे आहेत. मात्र काही ठिकाणी किल्ल्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील सर्वच किल्ल्यांच्या देखभाल-दुरुस्तीसंदर्भात घेतलेल्या संयुक्त बैठकीत वरळी किल्ल्याची दुरुस्ती आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. या किल्ल्याला विद्युतीकरण व प्रकाशझोत योजना कार्यान्वित करण्याबाबत राज्याच्या पुरातत्व व वस्तू संचालनालयाने याआधीच मंजुरी दिली आहे. पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱया कामासाठी स्थानिकांच्या सूचनाही विचारात घेऊनच काम करण्यात येत असल्याची माहिती जी/दक्षिणचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.
असे होणार काम
– वरळी किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी करण्यात येणार आहे.
– किल्ल्याच्या पश्चिम-दक्षिण बाजूला 10 मीटर जागेत हिरवळ.
– बॅसॉल्ट दगडाच्या पायवाटा, परिसराचे सुशोभीकरण.
– वरळी किल्ल्याची महिती देणारे बेसॉल्ट दगडावरील फलक.
– या ठिकाणी येणाऱयांसाठी बसण्यासाठी व्यवस्था.
– किल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी दिशादर्शक फलक.
– किल्ल्याला कायमस्वरूपी विद्युतीकरण प्रस्तावित.
– या कामासाठी दोन कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.



























































