आयुष्यातील माणसे हीच माझी मिळकत! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अपार श्रद्धेमुळे शिवचरित्राकडे वळलो. शिवराय समजून घेण्यासाठी खूप अभ्यास केला. यातूनच आपल्याला आजपर्यंतच्या आयुष्यात अगणित लोकांचे प्रेम मिळाले. त्यामुळे माझ्या आयुष्यातील माणसे हीच माझी मिळकत आहे, अशी भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने पुणे पत्रकार संघातर्फे वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पुरंदरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या धर्म, प्रांत, जातीचे नाहीत. त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची व्याप्ती अथांग आहे. शिवराय हे संपूर्ण जगाचे आहेत. शिवरायांनी प्रथम राष्ट्रीय विचार मांडला. शिवरायांचे राष्ट्रीयत्व स्थायीभाव झाला पाहिजे. इतिहासासह आपण जगत असतो. त्यामुळे इतिहास हा कधीच जुना नसतो, तर तो नेहमीच ताजा असतो.

मला मिळालेला ‘महाराष्ट्रभूषण’ मी आदरपूर्वक स्वीकारला असून, खूप आनंद आहे. पुरस्काररूपी मिळालेले 10 लाख आणि माझे 15 लाख मिळून ही रक्कम समाजकार्यासाठी दिली. माझे जीवन वेगळे नाही. सर्वसामान्यांसारखेच मीही जीवन जगलो आहे. माझे आई-वडीलही सामान्य होते. माझ्या वागण्याकडे वडिलांचे लक्ष होते. त्यामुळे माझे आई-वडील आणि माझ्यावर प्रेम करणाऱया लोकांना मी कधीच विसरू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांसंदर्भात वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन होत आहे. संशोधनासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो, याचे भान नवलेखकांनी बाळगले पाहिजे. आपल्याकडे डोंगरी, किनारी, सागरी, भुईकोट असे 352 किल्ले आहेत. किल्लेसंवर्धनासाठी जे करता येईल, ते केले पाहिजे. किमान 25 किल्ले जतन केले पाहिजेत, असेही पुरंदरे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे, श्री महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम उपस्थित होते.

आपले काही लोक परदेशात पाठवायला हवे होते

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात परदेशातील एक व्यक्ती 30 वर्षे आपल्या येथे राहून सर्व व्यवस्था समजून घेऊन परदेशात गेली. त्यावेळी महाराजांनी परदेशात आपले काही लोक पाठविले असते, तर तेथील अधिक माहिती मिळू शकली असती,’ असे मत यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या