
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तिघा दहशतवाद्यांना पोलिसांनी किश्तवाडमध्ये अटक केली. हे तिघेही हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी आहेत. त्यांचा आणखी तीन दहशतवादी कारवायांमध्ये हात आहे.
निसार अहमद शेख, निशाद अहमद आणि आझाद हुसेन अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही किश्तवाड जिल्हय़ातील रहिवासी आहेत. शेख आणि हुसेन यांनी त्यांच्या घरातच लपून बसण्यासाठी भुयार खोदले होते. किश्तवाडमध्ये भाजप नेते अनिल परिहार आणि त्यांचा भाऊ अजित आणि आरएसएसचे पदाधिकारी चंद्रकांत शर्मा यांच्या हत्येतही यांचा सहभाग होता. विशेष सुरक्षा अधिकाऱयांची शस्त्रेही त्यांनी पळवली होती. दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या हिजबुलच्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, असे जम्मू झोनचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले.
‘जैश’चे ते तिघे दहशतवादी पोपटासारखे बोलणार
कथुआ जिल्हय़ात ट्रकमध्ये लपून बसलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तिघा दहशतवाद्यांना लष्कराने गेल्या महिन्यात शस्त्रास्त्रांसह अटक केली होती. या तिघांचीही चौकशी आता जॉईंट इन्ट्रोगेशन सेंटरमध्ये (जेआयसी) रवानगी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये लष्करासह अनेक यंत्रणांकडून त्यांची चौकशी होणार आहे. ‘इंटेन्स इन्ट्रोगेशन’साठी हे सेंटर ओळखले जाते. त्यामुळे हे दहशतवादी इथे पोपटासारखे बोलते होणार आहे. हल्ल्याचा कट आणि सीमेपलीकडील घुसखोरीवर त्यामुळे प्रकाश पडणार आहे.



























































