
मराठा समाजाला आरक्षणासाठी दिलेली मुदत उलटल्यानंतर समाज मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनात मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. मात्र मराठवाड्यातील बीडमध्ये एका संतप्त जमावानं राजकारण्यांच्या घराला लक्ष्य करत पेटवून दिलं. गाड्यांची जाळपोळ, तोडफोड केली. या घटनांची गंभीर दखल गृह विभागानं घेतल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, फडणवीसांनी म्हंटलं आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत राज्य सरकार सकारात्मकतेने पावलं उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिलं आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बांधिल आहे. त्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करताहेत. विशेषकरून ज्याप्रकारे काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरं जाळली. अधिक गंभीर बाब म्हणजे घरात लोकं उपस्थित असतना घरं पेटवण्यात आल्याचे प्रकार अत्यंत चुकीचे आहेत. त्याचे व्हिडीओ फुटेज मिळालेले आहेत. त्यामधून 50-55 लोकांची ओळख पटली आहे. उर्वरित लोकांची ओळख पटवली जात आहे. या सर्व लोकांना पोलीस जीवे मारण्याचा प्रयत्न 307 कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शांततापूर्ण आंदोलनं सुरू असतील तिथे कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही. हिंसा करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश!
जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांवेळी काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यात सहभागी असल्याचं दिसून आल्याचं फडणवीस म्हणाले. व्हिडीओ फुटेजची तपासणी केल्यानंतर त्याची माहितीही सर्वांना देण्यात येईल, असं फडणवीसांनी सांगितले.






























































