पुण्यातील जुना बाजार परिसरात होर्डींग कोसळून चौघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिजमोहन पाटील, पुणे

पुण्यातील जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकामध्ये मोठं होर्डींग कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 10 जण जखमी असून त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जुना बाजार परिसरात ही दुर्घटना झाली असून यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

भगवानराव धोत्रे (४८), भिमराव कसारा (७०), शिवाजी परदेसी (४०) व जावेद मिसबुद्दीन खान यांचा मृत्यू झाला आहे. उमेश धर्मराज मोरे यांची प्रकृती गंभीर आहे. किरण ठोसर, यशवंत खोबरे, महेश वसंतराव विश्वेश्वर व रुक्मीणी परदेशी हे जखमी असून देवांश परदेशी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी या प्रकरणी रेल्वे प्रशासानावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. तर नियम मोडून हे जाहीरात फलक उभारण्यात आल्याचे महापौर मुक्ता टिकळ यांनी म्हटले आहे.

pune-hoarding-collapse-1

आरटीओ चौकाकडून मंगळवार पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा सिग्नल आहे. या सिग्नलला लागून रेल्वेच्या मोकळ्या जागेसाठी बांधलेल्या भिंतीला लागून हे होर्डींग उभं करण्यात येत होतं.

pune-hoarding-blood

होर्डींग उभं करत असताना त्याचा सांगाडा कोसळल्याने हे दुर्घटना घडली आहे. हा सांगाडा सिग्नलवर थांबलेल्या 6 रिक्षा, 1 कार आणि जवळपास 2 बाईकवर पडला. या सगळ्या गाड्यांचा चुराडा झाला असून ज्या नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, ते याच दुचाकी किंवा रिक्षातून प्रवास करत असावेत असा अंदाज आहे. सध्या हा सांगाडा क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचं काम सुरू आहे.